Join us  

श्रीलंकेत आणीबाणी जाहीर झाल्याने तणाव, भारतीय क्रिकेट संघ सुखरुप

जातीय हिंसाचाराचा वणवा पेटल्याने मालदीवपाठोपाठ श्रीलंकेमध्ये दहा दिवसांसाठी आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2018 3:54 PM

Open in App

कोलंबो - जातीय हिंसाचाराचा वणवा पेटल्याने मालदीवपाठोपाठ श्रीलंकेमध्ये दहा दिवसांसाठी आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट संघ सध्या तिरंगी मालिकेसाठी श्रीलंकेत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ श्रीलंकेत तिरंगी ट्वेन्टी-20 मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र त्यातच आणीबाणी जाहीर झाली असल्या कारणाने संघाच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी राजीव शुक्ला यांनी चिंता करण्याचं कोणतं कारण नसून, आजचा सामना ठरल्याप्रमाणे पार पडणार असल्याची माहिती दिली आहे.  मंगळवारी भारत आणि यजमान श्रीलंका यांच्यातील सामन्याने मालिकेला सुरुवात होणार आहे. 

राजीव शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'बीसीसीआय सतत टीम मॅनेजमेंटच्या संपर्कात आहे. सर्व काळजी घेण्यात येत आहे. सध्या तरी भारत आणि श्रीलंकेदरम्यान नियोजित सामना वेळेनुसार पार पडणार आहे'. बीसीसीआयनेही घटनेची माहिती देताना तणाव कँडी परिसरात असून कोलंबोमध्ये नसल्याचं सांगितलं आहे. 'श्रीलंकेत आणीबाणी आणि कर्फ्यू लावण्यात आल्याची माहिती येत आहे. तणाव कँडी परिसरात आहे, कोलंबोमध्ये नाही. सुरक्षा यंत्रणांशी संपर्क साधल्यानंतर कोलंबोमधील परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती मिळाली आहे', असं बीसीसीआयने सांगितलं आहे. 

श्रीलंकेच्या कँडी शहरात बौद्ध आणि मुस्लिमांमध्ये जातीय दंगली सुरु असल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. मंगळवारी सरकारच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली.   मागच्या वर्षभरापासून श्रीलंकेत बौद्ध आणि मुस्लिमांमध्ये वाढणाऱ्या तणावाने आता दंगलीचे स्वरुप घेतले आहे. श्रीलंकेत जबरदस्तीने इस्लाममध्ये धर्मांतर सुरु असल्याचा आरोप काही बौद्ध संघटना करत होत्या तसेच प्राचीन बौद्ध स्थळांची नासधूसही करण्यात आली होती. त्याच खदखदणाऱ्या असंतोषातून संघर्षाची ही ठिणगी पडली. 

म्यानमारमधून श्रीलंकेत आश्रयाला आलेल्या रोहिंग्या मुस्लिमांविरोधातही श्रीलंकेत बौद्ध संघटनांनी विरोध प्रदर्शन केले होते. देशाच्या अन्य भागात हा हिंसाचार पसरु नये यासाठी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत दहा दिवसांसाठी आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती सरकारचे प्रवक्ते दयासिरी जयासेकरा यांनी दिली. सोशल मीडिया फेसबुकच्या माध्यमातून या हिंसाचाराला चिथावणी देणाऱ्यांविरोधातही कठोर कारवाई करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.  

कँडीमध्ये जमावाने मुस्लिमांच्या दुकानांना आगी लावल्यानंतर सरकारने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तिथे विशेष तुकडया पाठवल्या आहेत. सिंहली बौद्ध आणि अल्पसंख्यांक मुस्लिमांमध्ये संघर्ष टाळण्यासाठी तिथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे.  

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघश्रीलंका