England vs Australia, 1st ODI : वन डे वर्ल्ड कप आणि आता ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकणाऱ्या इंग्लंडने २०२३मध्ये भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कपच्या तयारीला सुरूवात केली आहे. इंग्लंडने ४ फलंदाज अवघ्या ६६ धावांवर गमावले होते, परंतु डेवीड मलानने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. त्याच्या शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने समाधानकारक पल्ला गाठला. डेवीड मलान ( Dawid Malan) ने एकट्याने खिंड लढवून शतकी खेळी साकारताना ऑस्ट्रेलियासमोर तगडे लक्ष्य उभे केले.
ऑस्ट्रेलियाने एडिलेड येथे सुरू असलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पॅट कमिन्स आणि स्टार्क यांनी इंग्लंडच्या सलामीवीरांना ५ षटकांच्या आत माघारी पाठवले. कमिन्सने चौथ्या षटकात फिल सॉल्ट ( १४) याची विकेट घेतली. स्टीव्ह स्मिथने स्लीपमध्ये सुरेख झेल टिपला. त्यानंतर एका चेंडूच्या अंतराने स्टार्कने भन्नाट इनस्वींगर चेंडू टाकला अन् रॉय ( ६) त्यावर निरुत्तर झाला. स्टार्कने टाकलेल्या चेंडूने रॉयचा त्रिफळा उडवला अन् इंग्लंडचा दुसरा ओपनरही २० धावांवर माघारी परतला. त्यानंतर कमिन्स व मार्कस स्टॉयनिस यांनी पुन्हा धक्के दिले. जेम्स व्हिंसी ( ५) व सॅम बिलिंग्स ( १७) माघारी परतल्याने इंग्लंडची अवस्था ४ बाद ६६ अशी झाली होती.
डेव्हिड मलान व कर्णधार जोस बटलर यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांची ५२ धावांची भागीदारी अॅडम झम्पाने संपुष्टात आणली. बटलर २९ धावांवर बाद झाला. लिएम डॉसन ( ११) रन आऊट झाला, ख्रिस जॉर्डननेही ( १४) काही काळ किल्ला लढवला. मलान एकाबाजूने दमदार फटकेबाजी करत होता. ४६व्या षटकात त्याचा झंझावात रोखला गेला. झम्पाने ही विकेट मिळवून दिली. मलान १२८ चेंडूंत १२ चौकार व ४ षटकारांसह १३४ धावा करून माघारी परतला. झम्पाने ५५ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. इंग्लंडने ९ बाद २८७ धावा केल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"