England vs New Zealand : इंग्लंडने तिसऱ्या कसोटीत न्यूझीलंडवर ७ विकेट्स राखून विजय मिळवून मालिकेत ३-० असे निर्भेळ यश मिळवले. ऑली पोप, जो रूट व जॉनी बेअरस्टो यांनी दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी करताना इंग्लंडला हा विजय मिळवून दिला. बेअरस्टोने ४४ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ७१ धावांची आक्रमक खेळी केली. जो रूटने नाबाद ८६ धावा करताना संघाचा विजय पक्का केला. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील विजेत्या ( WTC) किवींना पराभूत केल्यानंतर इंग्लंडचा संघ टीम इंडियाला टक्कर देण्यासाठी सज्ज झाला आहे. १ ते ५ जुलै या कालावधीत भारत-इंग्लंड यांच्यातला पाचवा कसोटी सामना होणार आहे.
किवींच्या पहिल्या डावातील ३२९ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडची अवस्था ६ बाद ५५ अशी झाली होती. पण, जॉन बेअरस्टो ( १६२) व पदार्पणवीर जेमी ओव्हर्टन ( ९७) यांनी डाव सावरला. स्टुअर्ट ब्रॉडनेही ४२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करताना इंग्लंडला ३६० धावांपर्यंत मजल मारून दिली. किवींच्या दुसऱ्या डावात टॉम लॅथम ( ७६), कर्णधार केन विलियम्सन ( ४८), डॅरील मिचेल ( ५६) व टॉम ब्लंडल ( ८८) यांनी सुरेख खेळ केला. मिचेल व ब्लंडल या जोडीने पुन्हा एकदा किवींचा डाव सावरला. मिचेलने या दौऱ्यावर ६ डावांत १०७.६०च्या सरासरीने सर्वाधिक ५३८ धावा केल्या आहेत.
- पहिल्या कसोटीत इंग्लंडने २७९ धावांचे लक्ष्य ७८.५ षटकांत पार केले
- दुसऱ्या कसोटीत २९९ धावांचे लक्ष्य ५० षटकांत पार केले
- तिसऱ्या कसोटीत इंग्लंडने २९६ धावांचे लक्ष्य पार करण्यासाठी ५४.३ षटकं खेळली.