मुंबई - भारताविरुद्धच्या मालिकेत उल्लेखनीय कामगिरी करणारा इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम कुरन याला इंडियन प्रीमिअर लीगमधील (IPL) फ्रँचायझींकडून पसंती मिळत आहे. यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघ आघाडीवर असल्याचे कळत आहे. त्यामुळे 2019च्या आयपीएल लिलाव प्रक्रियेत कुरनला आपल्या ताफ्यात दाखल करुन घेण्यासाठी मोठी चढाओढ रंगण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ताफ्यात दाखल घेतल्यानंतरही कुरन संपूर्ण लीगमध्ये खेळणार नसल्याचे माहित असूनही फ्रँचायझींमध्ये त्याच्यासाठी चुरस पाहायला मिळेल. इंग्लंडच्या वन डे संघातील नियमित सदस्य असलेला कुरन पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेपर्यंत राष्ट्रीय संघासोबत अधिक सामने खेळणार आहे. त्यामुळे तो आयपीएलचा पूर्ण हंगाम खेळू शकणार नाही. इंग्लंडने पुढील वर्षांचे वेळापत्रक आधीच जाहीर केले आहे आणि त्यानुसार कुरन महिनाभरही आयपीएलमध्ये खेळणार नाही.