MI vs RCB Match । मुंबई : सध्या आयपीएलच्या (IPL 2023) सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे. मंगळवारी या स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होत आहे. मुंबईचा संघ आपल्या घरच्या मैदानावर अर्थात वानखेडे स्टेडियमवर विजय मिळवून पराभवाचा वचपा काढणार का हे पाहण्याजोगे असेल. लक्षणीय बाब म्हणजे हा सामना दोन्हीही संघांसाठी 'करा किंवा मरा' असा असणार आहे. मात्र, या सामन्याच्या पूर्वसंध्येलाच मुंबईच्या संघात मोठा बदल करण्यात आला असून जोफ्रा आर्चर आयपीएलमधून बाहेर झाला आहे.
खरं तर यंदाचा हंगाम आता अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. या हंगामातील पहिल्या सामन्यात आरसीबीने मुंबईचा पराभव केला होता. त्यामुळे मुंबईचा संघ पराभवाचा बदला घेण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. जोफ्रा आर्चरच्या दुखापतीमुळे मुंबईची डोकेदुखी आणखी वाढली आहे. त्याच्या जागी इंग्लिश गोलंदाज ख्रिस जॉर्डनला संघात स्थान मिळाले आहे.
मुंबई इंडियन्सने ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली. "ख्रिस जॉर्डन मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सामील होणार आहे. जोफ्रा आर्चर सध्या दुखापतीचा सामना करत असून त्याला विश्रांतीची गरज आहे. म्हणून त्याच्या जागी जॉर्डनला संधी देण्यात आली आहे. जॉर्डनला आर्चरची रिप्लेस म्हणून मुंबईने घेतले आहे. आर्चरच्या रिकव्हरी आणि फिटनेसवर इंग्लंड क्रिकेट बोर्डाद्वारे लक्ष ठेवले जात आहे. जोफ्रा आपल्या पुनर्वसनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी मायदेशी परतणार आहे", असे मुंबई इंडियन्सने स्पष्ट केले.
'करा किंवा मरा'चा सामना! RCBला नमवून पराभवाचा वचपा काढण्याचे मुंबईसमोर आव्हान
मुंबई पराभवाचा बदला घेणार?यंदाच्या हंगामात २ एप्रिल रोजी आयपीएलच्या पाचव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात चुरशीची लढत झाली होती. या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना १७१ धावा केल्या. आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूने २२ चेंडू शिल्लक असताना १७२ धावांचे लक्ष्य २ गडी गमावून गाठले आणि सामना ८ गडी राखून जिंकला. हा सामना दोन्ही संघांचा सलामीचा सामना होता. त्यामुळे आता आरसीबीला नमवून पराभवाचा बदला घेण्याचे आव्हान रोहितसेनेसमोर आहे.