Join us  

England vs Ireland 3rd ODI: 'तो' वर्ल्ड रेकॉर्ड महेंद्रसिंग धोनीच्या नावावर राहिला नाही; इयॉन मॉर्गनची सरशी

England vs Ireland 3rd ODI: महेंद्रसिंग धोनी निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे आणि आता त्याचे विक्रमही मोडले जात आहेत..

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2020 11:48 AM

Open in App

England vs Ireland 3rd ODI: पॉल स्टीर्लिंग आणि अँड्य्रू बॅलबीर्नीए यांच्या वैयक्तिक शतकी खेळीनं आयर्लंडला तिसऱ्या वन डे सामन्यात इंग्लंडवर रोमहर्षक विजय मिळवून दिला. 2011च्या वर्ल्ड कप स्पर्धेतही आयर्लंडनंइंग्लंडवर थरारक विजय मिळवला होता आणि याही वेळेला 329 धावांचे लक्ष्य आयर्लंडने पार केले. आयसीसी वर्ल्ड कप सुपर लीगमधील ही पहिलीच मालिका आहे आणि इंग्लंडने सुरुवातीचे दोन सामने जिंकून ती आधीच खिशात घातली होती.

तिसऱ्या सामन्यातही 328 धावांचा डोंगर उभा करून ते सहज जिंकतील, असे वाटले होते. पण, आयर्लंडच्या फलंदाजांनी त्यांना स्तब्ध केलं. पण, या सामन्यात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या नावावर असलेला विश्व विक्रम इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गननं नावावर केला.

प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या सलामीवीरांना अपयश आले. इंग्लंडचे आघाडीचे तीन फलंदाज अवघ्या 44 धावांवर माघारी परतले होते. पण, कर्णधार इयॉन मॉर्गननं आणि टॉम बँटन यांनी डावाला आकार देताना दीडशतकी भागीदारी केली. बँटन 58 धावा करून माघारी परतला. पण, मॉर्गननं 84 चेंडूंत 15 चौकार व 4 षटकार खेचून 106 धावांची खेळी केली. त्याला डेव्हिड विली ( 51) आणि टॉम कुरन ( 38) यांची साथ लाभली. इंग्लंडनं 49.5 षटकांत सर्वबाद 328 धावा केल्या.

प्रत्युत्तरात पॉल स्टीर्लिंग आणि अँड्य्रू बॅलबीर्नीए यांनी खिंड लढवली. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेला हा सामना आयर्लंडनं 49.5 षटकांत खिशात घातला. स्टीर्लिंगनं 128 चेंडूंत 9 चौकार व 6 षटकार खेचून 142 धावा चोपल्या, तर बॅलबीर्नीएनं 112 चेंडूंत 12 चौकारांसह 113 धावांची संयमी खेळी केली.  केव्हीन ओ'ब्रायननं अखेरच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर एक धाव घेत आयर्लंडचा 7 विकेटनं विजय निश्चित केला. या विजयानं आयर्लंडने वर्ल्ड कप सुपर लीगच्या गुणतालिकेत खाते उघडले.

या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनने शतक झळकावले. २०१९ च्या वर्ल्ड कपनंतर इंग्लंडच्या खेळाडूने शतक झळकावले. मॉर्गनची ही शतकी खेळी महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडणारी ठरली. या सामन्यात मॉर्गनने ४ षटकार खेचले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या कर्णधाराचा विक्रममॉर्गनने स्वतःच्या नावावर केला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे कर्णधार

  • २१२* - इयॉन मॉर्गन
  • २११ - महेंद्रसिंग धोनी
  • १७१ - रिकी पॉंटिंग 
  • १७० - ब्रेंडन मॅककुलम

 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीइंग्लंडआयर्लंड