लंडन : दुसऱ्या स्थानावर असलेला न्यूझीलंड दोन कसोटी सामन्यांची मालिका यजमान इंग्लंडविरुद्ध खेळणार असून, पहिला सामना बुधवारपासून ऐतिहासिक लॉर्डस् मैदानावर रंगणार आहे. भारताविरुद्ध १८ जूनपासून होणाऱ्या डब्ल्यूटीसी अंतिम सामन्याआधी न्यूझीलंडची ही तयारी असल्याचे मानले जाते. या मालिकेत ट्रेंट बोल्टचे खेळणे अनिश्चित आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या कसोटीत जेम्स ब्रेसी हा पदार्पण करणार आहे.
न्यूझीलंडचे कोच गॅरी स्टीड यांच्यानुसार बोल्ट हा इंग्लंडविरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळण्याऐवजी भारताविरुद्ध होणाऱ्या अंतिम सामन्यावर लक्ष केंद्रित करील. येथे दोन्ही सामन्यांत तो खेळणार नाही. स्टीड पुढे म्हणाले, ‘बोल्ट गुरुवारी इंग्लंडमध्ये दाखल होईल. नियमानुसार तो क्वारंटाइन होणार आहे.
तिसऱ्या स्थानावरील इंग्लंड संघात आयपीएलमध्ये असलेले अष्टपैलू बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, मोईन अली, सॅम कुरेन, यष्टीरक्षक जोस बटलर, गोलंदाज ख्रिस वोक्स आणि जॉनी बेयरस्टो हे खेळणार नाहीत. यातील काही जण मात्र दुसऱ्या सामन्यात खेळताना दिसतील.
न्यूझीलंडकडे बोल्टच्या अनुपस्थितीतही गोलंदाजीत पर्याय आहेत. संघात विलियम्सन, जेमिसन, टेलर, वेगनर, निकोल्स, पटेल, रवींद्र, सेंटनर, साऊदी, बीजे वाटलिंग, डेवन कॉनवे आदी दिग्गजांचा भरणा आहे.
उभय संघ यातून निवडणार
इंग्लंड : ज्यो रूट (कर्णधार), जेम्स अँडरसन, जेम्स ब्रेसी, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जॅक क्रॉले, हसीब हमीद, सॅम बिलिंग्स, डेन लॉरेंस, जॅक लीच, क्रेग ओवर्टन, डोम सिबली, ओली स्टोन, मार्क वूड, ओली पोप आणि ओली रॉबिन्सन.
न्यूझीलंड : केन विलियम्सन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, मॅट हेन्री, काइल जेमिसन, रॉस टेलर, नील वेगनर, हेन्री निकोल्स, एजाज पटेल, रचिन रवींद्र, मिशेल सेंटनर, टीम साऊदी, बीजे वाटलिंग, विल यंग, टॉम लाॅथम, डेरिल मिशेल, डग ब्रेसवेल, डेवन कॉनवे, कॉलिन डी ग्रैंडहोम आणि जेकब डफी.
का खेळली जात आहे मालिका?
इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांची मालिका भविष्यातील दौरा कार्यक्रमाचा (एफटीपी) भाग नाही. दोन्ही सामने विश्व कसोटी अजिंक्यपदासाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत. आयपीएल खेळणारे इंग्लिश खेळाडू बाहेर असतील. दोन्ही संघांचे वेळापत्रक व्यस्त असताना मालिकेचा अट्टहास का? त्यामागील कारण असे की, कोरोनामुळे २०२० चा हंगाम वाया गेला. यामुळे ईसीबीचे नुकसान झाले. स्थानिक आयोजक आणि प्रसारणकर्ते यांचे नुकसान भरून काढण्यासाठी क्रिकेट होत आहे. उदा. एजबस्टन मैदानावर भारताविरुद्धच्या कसोटीआधी आणखी एक सामना व्हावा आणि १८ हजार प्रेक्षकांना क्रिकेटचा आनंद घेता यावा यासाठी ईसीबीने दुसरी कसोटी तेथे आयोजित केली आहे.
Web Title: England vs New Zealand Trent Boult To Miss Test Series
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.