१९९८साली मलेशियात झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुषांच्या क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. भारतासह १२ देशांनी त्यात सहभाग घेतला होता आणि दक्षिण आफ्रिकेनं अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला ४ विकेटने नमवून सुवर्णपदक नावावर केले होते. न्यूझीलंडनं कांस्यपदकाच्या सामन्यात श्रीलंकेवर विजय मिळवला होता. ब गटात समावेश असलेल्या भारतीय संघाला ३ पैकी एकच सामना जिंकता आल्यानं त्यांचे आव्हान गट साखळीत संपुष्टात आले होते. आता २४ वर्षांनी राष्ट्रकुल स्पर्धेत पुन्हा क्रिकेटचे कमबॅक होत आहे. पण, यावेळी महिला क्रिकेटचा समावेश असणार आहे आणि इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघानं यजमान म्हणून त्यांचं तिकीट आधीच पक्क केलं आहे.
२०१७च्या वर्ल्ड कप विजेत्या इंग्लंड संघासह २०२२च्या राष्ट्रकुल स्पर्धेत ( 2022 Commonwealth Games) आठ संघ सहभाग घेणार आहेत. त्याबाबतची क्वालिफिकेशन नियम राष्ट्रकुल स्पर्धा फेडरेशन आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( ICC) यांनी बुधवारी जाहीर केले. २८ जुलै ते ८ ऑगस्ट २०२२ या कालावधीत राष्ट्रकुल स्पर्धा पार पडणार आहे.
स्पर्धेच्या पात्रता फेरीचे नियम१ - यजमान संघ थेट पात्र२ - आयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रमवारीत १ एप्रिल २०२१पर्यंत अव्वल सहा क्रमांकावर असलेल्या संघांना प्रवेश३ - पात्रता फेरीतून उर्वरित एखा संघाची होईल निवड
इंग्लंडची कर्णधार हिथर नाइट म्हणाली,''घरच्या मैदानावर होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत खेळण्यासाठी आम्ही फारच उत्सुक आहोत. राष्ट्रकुल स्पर्धेत खेळण्याची संधी मिळेल, असे स्वप्नही पाहिले नव्हते. क्रिकेटला वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याची ही संधी आहे.''
भारतीय संघ कितव्या स्थानीसध्याच्या ट्वेंटी-20 क्रमवारीनुसार ऑस्ट्रेलियाचा महिला संघ ८४३८ गुणांनुसार अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर इंग्लंड ( ८४०५), भारत ( ८६४०), न्यूझीलंड ( ६१९७), दक्षिण आफ्रिका ( ५९७८), वेस्ट इंडिज ( ६१२६) आणि पाकिस्तान ( ५५१६) यांचा क्रमांक येतो.