ब्रिस्टल : इंग्लंडच्या महिला संघाने भारताविरुद्ध एकमेव कसोटीच्या पहिल्या दिवशी बुधवारी शानदार सुरुवात करीत चहापानापर्यंत २ बाद १४७ अशी वाटचाल केली. लॉरेन विलफिल्ड हिल (३५) आणि सलामीची टॅमी ब्यूमोंट (६६) यांनी उपयुक्त योगदान दिले. अखेरचे वृत्त लिहिस्तोवर कर्णधार हीथर नाईट ४१ धावांवर खेळत होती. त्याआधी, उपाहारापर्यंत इंग्लंडने १ बाद ८६ अशी वाटचाल केली होती.
इंग्लिश कर्णधार नाईटने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. अनुभवी झुलन गोस्वामी आणि शिखा पांडे यांनी शिस्तबद्ध मारा करीत सलामीच्या फलंदाजांना चांगलेच त्रस्त केले. सातव्या षटकात झुलनच्या चेंडूवर पहिल्या स्लिपमध्ये स्मृती मानधना हिने विनफिल्डचा सोपा झेल सोडला. त्यावेळी ती केवळ तीन धावांवर होती. पदार्पण करणारी पूजा वस्त्रकारच्या चेंडूवर पुन्हा एकदा तिला अभय मिळाले. शिखाच्या चेंडूवर षटकार खेचून १७ व्या षटकात संघाच्या ५० धावा पूर्ण केल्या. ६९ धावा असताना मात्र पूजाने विनफिल्डला यष्टिरक्षक तानिया भाटियाकडे झेल देण्यास भाग पाडले. ब्यूमोंट ही उपहारानंतरच्या खेळार अर्धशतक ठोकल्यानंतर बाद झाली.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड पहिला डाव : ५१ षटकात २ बाद १४७ धावा (लॉरेन विनफिल्ड ३५, टॅमी ब्यूमोंट ६६, हीथर नाईट खेळत आहे ३७, नताली स्किवर खेळत आहे १०) गोलंदाजी: पूजा वस्त्रकार १/३४, स्नेहा राणा १/३३.
शेफालीसह पाच खेळाडूंचे पदार्पण
या सामन्याद्वारे भारताच्या पाच खेळाडूंनी कसोटी पदार्पण केले. त्यात शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्रकार, स्नेहा राणा आणि तानिया भाटिया यांचा समावेश आहे. इंग्लंडकडून सोफिया डंक्ले हिचे पदार्पण झाले. भारतीय संघ सात वर्षानंतर कसोटी सामना खेळत असून मागची कसोटी नोव्हेंबर २०१४ ला द. आफ्रिकेविरुद्ध खेळली होती.
Web Title: England's good start against India women test match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.