चेन्नई, दि. 15 - भारताचा शिखर धवन हा सलामीवीर घरगुती कारणांमुळे ऑस्ट्रेलियाच्या मालिकेत तीन सामने खेळणार नाही. अशीच समस्या कागारूंपुढेही ठाकली आहे. ऑस्ट्रेलियाचा एक धडाकेबाज सलामीवीर दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे कांगारुंपुढेही समस्या ठाकली आहे. भारताबरोबर पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु होण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाला दुखापतीचे ग्रहण लागल्याचे दिसत आहे. ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज अरॉन फिंच दुखापतीमुळे वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याची दुखापत किती मोठी आहे आणि तो किती सामन्यासाठी बाहेर आहे, याबाबत कोणतेही वृत्त आलेलं नाही. पण फिंचच्या जागी पीटर हॅंड्सकोम्बला त्याच्या जागी ऑस्ट्रेलियातून पाचारण करण्यात आले आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ सामन्यांची मालिका रविवारपासून सुरु होत आहे.
दोन आठवड्यांपूर्वी घोषित झालेल्या ऑस्ट्रेलिया संघात पीटर हॅंड्सकोम्बचा समावेश नव्हता. सरावादरम्यान अरॉन फिंच जखमी झाल्यामुळे हॅंड्सकोम्बला पाचारण करण्यात आले आहे. ज्या वेळी सरावादरम्यान फिंच जखमी झाला तेव्हा तो केवळ पहिले एक -दोन सामने तो संघाबाहेर राहील अशी शक्यता होती. परंतु ही जखम गंभीर असल्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाने पीटर हॅंड्सकोम्बला पाचारण केले आहे. तर दरम्यान, बायको आजारी असल्यामुळे तिची काळजी घेण्यासाठी शिखर धवनने पहिल्या तीन वनडेतून माघारी घेतली आहे.
ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज अरॉन फिंचच्या डाव्या पायाच्या स्नायूंमध्ये सराव सत्रात पुन्हा दुखापत झाली आहे. फिंच चिंदबरम स्टेडियममध्ये झालेल्या सरावसत्रात दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे तो पुढे सराव करू शकला नाही. फिंच च्या जागी ट्रेव्हिस हेड किंवा हिल्टन कार्टराइट हे वॉर्नरच्या साथीने सामन्यात डावाची सुरुवात करू शकतात.
एक क्षेत्ररक्षक बाजी पलटू शकतो : ट्रेविस हेड
ऑस्ट्रेलिया संघात काही दमदार क्षेत्ररक्षक आहेत. त्या जोरावर ऑस्ट्रेलिया भारताविरोधात कधीही बाजी पलटू शकतो, असे ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रॅविस हेड याने म्हटले आहे. हेड याने पत्रकारांशी बोलताना सांगितले की, 'क्षेत्ररक्षणाद्वारे तुम्ही सामना जिंकू किंवा हरू शकता. ऑस्ट्रेलिया संघाला आपल्या क्षेत्ररक्षणावर अभिमान आहे आणि आम्ही या कौशल्यावर मेहनतदेखील घेतली आहे.' त्यामुळे आम्हाला दबावाच्या परिस्थितीत सर्वोच्च क्षेत्ररक्षण करावे लागेल असे हेड म्हणाला. आमच्याकडे काही सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या जोरावर आम्ही सामना जिंकू शकतो असे मतही त्यानं व्यक्त केलं आहे.