आयपीएलची सर्वाधिक ५ जेतेपदं नावावर असलेल्या मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात सहा सामन्यांत एकही विजय मिळवता आलेला नाही. हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, ट्रेंट बोल्ट, क्विंटन डी कॉक ही बसलेली घडी विस्कळीत झाल्यानंतर मुंबई इंडियन्स जणू विजय मिळवणे विसरलाच आहे. १५ कोटींपेक्षा अधिक रक्कम मोजून संघात पुन्हा दाखल करून घेतलेल्या इशान किशनला काही खास करता आलेले नाही. कर्णधार रोहित शर्माचा फॉर्मही चिंतेचा विषय ठरतोय. त्यात प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह यालाही प्रभाव पाडता आलेला नाही. डेथ ओव्हरमध्ये त्याला साथ देणारा गोलंदाज मुंबई इंडियन्सकडे नाही. अशात टायमल मिल्स ( Tymal Mills ) हाही आयपीएल २०२२मधून माघार घेण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त समोर आले. त्याच्या या निर्णयामागे दुखापत हे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. पण, मुंबई इंडियन्सच्या या गोलंदाजाने सत्य समोर आणले.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला यंदाच्या आयपीएलमध्ये अपयश आलेले पाहयला मिळतेय. दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्स व लखनौ सुपर जायंट्स या संघांकडून त्यांना हार मानावी लागली आहे. गुरुवारी त्यांच्यासमोर गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सचे ( MI vs CSK) आव्हान आहे. तत्पूर्वी टायमल मिल्सच्या माघारीचे वृत्त येऊन धडकले. मिल्सने ५ सामन्यांत ६ विकेट्स घेतल्या आहेत आणि ३ बाद ३५ ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. बुमराहला डेथ ओव्हरमध्ये सक्षमपणे साथ देण्याची ताकद मिल्समध्ये आहे. पण, त्याच्या माघारीचे वृत्त सत्य असल्यास मुंबईची डोकेदुखी आणखी वाढणार हे निश्चित आहे.
एका ट्विट अकाऊंटवरून टायमल मिल्सच्या दुखापतीच्या आणि त्यामुळे आयपीएल २०२२तून माघारीचे वृत्त व्हायरल झाले. मिल्सने स्वतः त्या ट्विट अकाऊंटवर रिप्लाय दिला आणि सत्य समोर आणले. त्याने लिहिले की, मला माहीत नाही तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला ही अशी माहिती कुठून मिळते, परंतु तुम्ही चुकीचे आहात. मी पूर्णपणे तंदुरुस्त आहे. त्यामुळे कृपया तुम्ही केलेलं ट्विट डिलीट करा.