भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन ( Shikhar Dhawan) याच्यावर नेटिझन्स खूप खूश झाले आहेत. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश येथे १७ वर्षांखालील मुलींच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत खेळाडूंना टॉयलेटमध्ये जेवण वाढण्याचा व्हिडीओ व्हायरल जाला होता. त्यावरून धवनने थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( CM Yogi Adityanath ) यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली होती. धवनने कबड्डीपटूंसाठी केलेल्या या ट्विटने नेटिझन्सचे मन जिंकले आणि त्याच्यावर कौतुकाचा वर्षावही होतोय. काहींनी भारताच्या अन्य क्रिकेटपटूंना यावरून लक्ष्य करण्याची संधी सोडली नाही.
उत्तर प्रदेशमधील सहारनपुर जिल्ह्यात हा लाजीरवाणा प्रकार घडला होता. १६ सप्टेंबरला येथील डॉ. भीमराव आंबेडकर स्टेडियममध्ये अनेक जिल्ह्यांतून खेळाडू सहभाग घेण्यासाठी आले होते. त्यांना दिले गेलेले जेवण अत्यंत खराब होते. डाळ, भाज्या व भात कच्चाच होता. व्हिडीओत हे जेवण शौचालयामधील जमीनीवर ठेवलेले पाहायला मिळत आहे आणि खेळाडूंना ते खावे लागले होते.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिखर धवनने ट्विटच्या माध्यमातून CM योगी यांच्याकडे दाद मागितली. त्याने ट्विट केले की, "राज्यस्तरीय स्पर्धेत कबड्डीपटूंना शौचालयात ठेवलेले जेवण दिले जाणे हे अत्यंत निराशाजनक आहे. मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेश सरकारला विनंती करतो की याकडे लक्ष द्यावे आणि योग्य ती कारवाई करावी."