ओमकार संकपाळ -
आयपीएलचा सोळावा हंगाम संपताच भारतीय शिलेदार राष्ट्रीय कर्तव्यावर रूजू झाले. विराट कोहली, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव यांसह काही जण पहिल्या फळीत इंग्लंडमध्ये दाखल झाले. मोठ्या कालावधीपर्यंत चाललेली ट्वेंटी-२० क्रिकेटची 'मालिका' संपवून अखेर आंतररराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 'कसोटी' पाहायला मिळते आहे. ही कसोटी जिंकून जगज्जेतेपद मिळवण्याचे रोहित ॲंड कंपनीसमोर मोठं आव्हान असणार आहे. ७ जूनपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलच्या सामन्याला सुरूवात होत आहे. सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या भारताला यावेळी यश मिळतं का हे पाहण्याजोगं असेल. इंग्लिश खेळपट्टीवर सामना होणार म्हटलं की, भारतीय चाहत्यांमध्ये एक वेगळीच भीती असते. तेथील वातावरण आणि गोलंदाजाची गती लक्षणीय असते. त्यामुळं आपलं वेगवान गोलंदाज तोडीस तोड ठरतील का याबाबत चाहेत चिंतेत असतात पण अनेकदा भारताच्या वेगवान गोलंदाजांनी विदेशातील खेळपट्टीवर आपला झेंडा रोवलाय... पण ही भीती असणं साहजिकच कारण समोर बलाढ्य ऑस्ट्रेलिया आहे. लंडनच्या खेळपट्टीवर नेहमीच वेगवान गोलंदाजांचं वर्चस्व राहिलंय. त्यामुळे मोठ्या पर्वानंतर पाच दिवसांचा सामना खेळत असलेल्या भारतीय गोलंदाजांची 'कसोटी' लागणार हे नक्की.
खरं तर WTC फायनलचा सामना भारतीय गोलंदाज विरूद्ध ऑस्ट्रेलियन गोलंदाज असाच काहीसा असेल. कारण इंग्लिश खेळपट्टीवर गोलंदाजांची गती अन् त्यांचा प्रभावी मारा सामन्याचा निकाल ठरवत असतो. लक्षणीय बाब म्हणजे जवळपास सहा महिन्यांपूवी भारताने कसोटी सामना खेळला होता. आयपीएलमध्ये व्यग्र असल्यामुळे भारतीय शिलेदारांना ट्वेंटी-२० क्रिकेटनं अधिकच आपलंस केलं. त्यामुळे पाच दिवसांच्या सामन्यात वेगानं गोलंदाजी करण्याचं सातत्य भारतीय गोलंदाज राखतात का हे पाहण्याजोगं असेल. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची फळी पाहिली तर अंगावर काटा येण्यासारखीच. मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, जोश हेझलवुड आणि कॅमेरून ग्रीन यांसारखे घातक गोलंदाज कांगारूकडे आहेत. तर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव यांच्याकडे भारताच्या आक्रमक माऱ्याची जबाबदारी असेल.
इंग्लिश खेळपट्टीवर गोलंदाजांचा बोलबाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या फायनल सामन्यात भारताला यजमान न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता. पण यंदा परिस्थिती वेगळी आहे, कोणत्याच संघाला 'होम क्राउड अथवा होम ग्राउंड'चा फायदा होणार नाही. कारण दोन्हीही संघ आपल्या घरापासून बाहेर खेळत आहेत. ही भारतासाठी काही प्रमाणात जमेची बाजू असण्याची शक्यता आहे. पहिल्या फायनलच्या सामन्यात साहजिकच किवी संघाला आपल्या घरच्या चाहत्यांसमोर खेळताना फायदा झाला असावा. ही केवळ चाहत्यांची भावना नसून मोहम्मद शमीनं देखील आयपीएलदरम्यान या वृत्ताला दुजारा दिला होता. ऑस्ट्रेलियन संघ देखील घरापासून दूर खेळतोय त्यामुळे आता त्यांना देखील होम क्राउडचा फायदा मिळणार नाही, असं खुद्द शमीनं म्हटलं होतं.
भारतीय गोलंदाजांची 'अग्निपरीक्षा'दरम्यान, भारतीय गोलंदाज सातत्याने ट्वेंटी-२० क्रिकेट खेळत असल्याने त्यांच्यात ५ दिवस त्यांच्या सरासरी वेगानं गोलंदाजी करण्याची क्षमता आहे का?, भले त्यांनी दोन्ही डावात प्रभावी मारा केला तरी गतीत सातत्य राखण्याचं त्यांच्यासमोर मोठं आव्हान असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. एकूणच आगामी फायनलचा सामना म्हणजे भारतीय गोलंदाजांची 'अग्निपरीक्षा'च असणार आहे.
दुसरीकडे, भारताच्या फलंदाजांना देखील इंग्लिश खेळपट्टीवर मोठी कसरत करावी लागणार आहे. प्लेइंग इलेव्हन काय असू शकते यावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत इशान किशन की केएस भरत याकडे अवघ्या क्रिकेट वर्तुळाचे लक्ष लागलंय. परंतु हे सगळं काही ७ जूनलाच स्पष्ट होईल. स्टार्क, कमिन्स यांसारख्या घातक गोलंदाजांचा चेंडू सावधतेने खेळणं तितकचं महत्त्वाचं आहे. कारण भारतीय गोलंदाजांप्रमाणे फलंदाजांना देखील ट्वेंटी-२० क्रिकेटनं मोठ्या कालावधीपर्यंत घट्ट मिठी मारली होती. मोठ्या कालावधीपर्यंत २० षटकांचं क्रिकेट खेळल्यानंतर कसोटी खेळणं ही एक मोठी कसोटीच. पण भारतीय शिलेदारांचा सध्याचा फॉर्म पाहता भारत 'कसोटी'त पास होऊन जगज्जेतेपद नक्की मिळवेल अशी आशा बाळगूया... आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणारा शुबमन गिल सातत्य कायम ठेवून 'कसोटी' जिंकतो का हे येणारा काळच ठरवेल.