नवी दिल्ली - सध्या विराट कोहली भन्नाट फॉर्ममध्ये आहे. विराट फलंदाजीसाठी मैदानावर उतरल्यानंतर कुठल्या ना कुठल्या नव्या विक्रमाची नोंद त्याच्या नावावर होतेय. श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या तिस-या कसोटीत विराटने शनिवारी 5 हजार धावांचा टप्पा गाठला पण त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात 16 हजार धावा करणारा तो पहिला खेळाडू बनला आहे.
त्याने 350 डावात 54.27च्या सरासरीने 16012 धावा केल्या आहेत. यापूर्वी हा विक्रम आफ्रिकेच्या हाशिम अमलाच्या नावावर होता. अमलाने 363 डावात ही कामगिरी केली होती. कसोटी क्रिकेटमध्ये वेगाने 5 हजार धावा पूर्ण करणारा विराट चौथा भारतीय फलंदाज आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सुनिल गावसकर यांनी वेगाने 5 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. त्यांनी 95 डावांमध्ये हा टप्पा गाठला. विरेंद्र सेहवाग (98डाव), सचिन तेंडुलकर (103 डाव) आणि विराट कोहली (105 डाव) चौथ्या स्थानी आहे. अशी कामगिरी करणारा विराट 11 वा भारतीय फलंदाज आहे. विराटचा हा 63 वा कसोटी सामना असून त्याने 51.82 च्या सरासरीने 14 अर्धशतक आणि 19 शतक झळकवली आहेत.
कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून एकदिवसीय आणि टी-20 सोबत कसोटीमध्येही नवनवे रेकॉर्ड करताना दिसत आहे. श्रीलंकेविरोधात दुस-या कसोटी सामन्यात कर्णधार म्हणून दुहेरी शतक ठोकत विराटने ब्रायन लाराच्या रेकॉर्डची बरोबरी केली होती. अर्धशतकाचं रुपांतर शतकात करण्याचा महान फलंदाज डॉन ब्रॅडमॅन यांचा रेकॉर्डही विराट कोहलीने मोडला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलदगतीने पाच हजार धावा पुर्ण करण्याचा विक्रम डॉन ब्रॅडमॅन यांच्या नावे आहेत. त्यांनी फक्त 36 सामन्यांतील 56 डावांत हा पाच हजार धावांचा टप्पा पुर्ण केला होता.
भारताने दुस-या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा एक डाव आणि 239 धावांनी पराभव केला आहे. या विजयासोबत भारताने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. पहिला कसोटी सामना पावसामुळे ड्रॉ करण्याची नामुष्की ओढवली होती.