जयपूर : भारत आणि न्यूझीलंड संघादरम्यान पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामना येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर बुधवारी रंगणार आहे. सामन्यादरम्यान दवबिंदू पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत असला तरी नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला हवा तसा लाभ मिळण्याची शक्यता नाही. येथे आठ वर्षांनंतर पहिल्यांदा सामना होत आहे. सध्या थंडीची चाहूल लागली असून, दोन दिवसांपासून सायंकाळी ७ वाजता हुडहुडी भरते. सामनादेखील याचवेळी सुरू होणार असल्याने मैदानावर दवबिंदू पाहायला मिळतील. आरसीएच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार येथे नाणेफेक कुणीही जिंकले तरी त्या संघाला फारसा लाभ मिळण्याची शक्यता नाही.
यूएईत रविवारी संपलेल्या टी-२० विश्वषचकादरम्यान दवबिंदूंची भूमिका निर्णायक ठरली होती. नाणेफेक जिंकणाऱ्या संघांनी धावांचा पाठलाग करण्यास पसंती दर्शविली होती. हा अधिकारी पुढे म्हणाला, ‘मागच्या दोन दिवसांतील अनुभव पाहता येथे पहिल्या डावातच दवबिंदूंचा परिणाम जाणवू लागेल. अशावेळी नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला लाभ मिळणार नाही. टी-२० लढत असल्याने येथील खेळपट्टीवर धावांचा पाऊस पडू शकतो. सामन्याच्या दिवशी आम्ही दवबिंदू रोखणारा स्प्रे मारणार आहोत; पण याचा परिणाम फार थोडावेळ असतो हे सर्वांना माहिती आहे.’ २०१३ ला येथे एकदिवसीय सामना झाला होता. भारताने त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या २५९ धावांचा पाठलाग करताना केवळ ४३.३ षटकांत लक्ष्य गाठले होते. त्यावेळी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी शतकी खेळी केली होती. राजस्थान क्रिकेटमधील प्रशासकीय संकटामुळे दहा वर्षे आयोजनाची संधी मिळू शकली नाही. आगामी फेब्रुवारी महिन्यात मात्र याच स्टेडियमवर एकदिवसीय सामन्याचे आयोजन होणार आहे. प्रेक्षकांच्या उपस्थितीवर मर्यादा नसल्याने २५ हजार क्षमतेचे हे स्टेडियम खच्चून भरण्याची शक्यता आहे. ऑनलाइनमुळे केवळ तीन तासांत सर्वच तिकिटे विकली गेली. दीर्घकाळानंतर सामना होत असल्याने चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. कोरोनामुळे उत्सव साजरा करण्यास मुकलेल्या अनेकांना या सामन्याचे प्रत्यक्ष साक्षीदार व्हायचे आहे.
अनेक कर्मचारी मास्कविना आरसीएने कोरोना प्रोटोकॉलचे पालन करण्याचे आश्वासन दिले खरे; पण सोमवारी मैदानावर अनेक कर्मचारी विनामास्क फिरताना दिसले. बीसीसीआयच्या प्रसारण टीममधील अनेक जण मास्कविना वावरत होते. बुधवारी प्रवेश करण्याआधी मात्र सर्वांसाठी लसीचा किमान एक डोस घेतला असल्याची खात्री केली जाईल. लस घेतली नसल्यास ४८ तास आधी आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट दाखवावा लागेल. त्याशिवाय आत सोडले जाणार नाही.
भारतीय खेळाडूंंनी गाळला घाम!धावांसाठी संघर्ष करीत असलेला उपकर्णधार अजिंक्य रहाणेसह काही भारतीय खेळाडूंनी न्यूझीलंडविरुद्ध २५ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी मुंबई येथील बीकेसी परिसरात सोमवारी सराव सुरू केला. रहाणेसाठी ही मालिका महत्त्वाची आहे. त्याला धावा काढण्यात अपयश आल्यास निवडीवर गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात. नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत कानपूरमध्ये पहिल्या कसोटीत अजिंक्य नेतृत्वदेखील करेल. दुसरी कसोटी मुंबईच्या वानखेडे मैदानावर ५ डिसेंबरपासून सुरू होईल.
रहाणेने १५ कसोटीत ६४४ धावा केल्या. मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये मेलबोर्न कसोटीत अविस्मरणीय खेळी केल्यापासून धावा काढण्यासाठी तो धडपडत आहे. मुंबईचा गोलंदाज तुषार देशपांडे याच्या चेंडूंवर रहाणेने बचावात्मक फटकेबाजी केली. अभय कुरुविलाच्या मार्गदर्शनात सुरू झालेल्या या शिबिरात चेतेश्वर पुजारा आणि ऑफ स्पिनर जयंत यादव हेदेखील सहभागी झाले. याशिवाय युवा फलंदाज शुभमन गिल, मयंक अग्रवाल, गोलंदाज ईशांत शर्मा, प्रसिद्ध कृष्णा यांनी दोन तास घाम गाळला. यावेळी एनसीएचे पदाधिकारी सरावादरम्यान कामगिरी न्याहाळताना दिसले.