मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगच्या यशानंतर शेजारील राष्ट्रांतही ट्वेंटी-२० लीगचे वारे वाहू लागले. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यापाठोपाठ आता अफगाणिस्तानातही प्रीमिअर लीग होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली छाप पाडू इच्छिणाऱ्या अफगाणिस्तान संघासाठी ही लीग महत्त्वाची ठरणार आहे. त्यांना भारताच्या खेळाडूंकडूनही मार्गदर्शन मिळणार आहे. या लीगमधील 'नांगरहार' संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा भारताचा माजी गोलंदाज सांभाळणार आहे.
भारताचा ४९ वर्षांचा माजी गोलंदाज वेंकटेश प्रसाद पुन्हा एकदा प्रशिक्षकाची टोपी परिधान करणार आहे, असा दावा एका इंग्रजी वृत्तपत्राने केला आहे. प्रसाद सध्या आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाब संघासोबत काम करत आहे. त्याने या वर्षाच्या सुरुवातीला पंजाब संघाच्या गोलंदाज प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली. मात्र भारताच्या कनिष्ठ गटातील निवड समितीत असल्याने त्याला हे पद सोडावे लागू शकते.