मडगाव: गोव्याचा माजी रणजी खेळाडू राजेश घोडगे (44)यांचे काल रविवारी दूर्दैवी निधन झाले. मडगावच्या मडगाव क्रिकेट क्लब सदस्याची काल येथील राजेंद्र प्रसाद मैदानावर क्रिकेट स्पर्धा होती. एमसीसी ड्रॅगन्स विरुध्द एमसीसी चॅलेंजर्स यांच्यात सामना होता. राजेश हा एमसीसी चॅलेंजर्सतर्फे खेळत होता. नॉन स्ट्रायकरवर असताना अचानक तो खाली कोसळला. मागाहून त्याला तात्काळ जवळच्या इएसआय इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर लगेच त्याला व्हीकटर इस्पितळात हलवण्यात आले असता तेथे त्याला मृत्यू आला.
काल दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास येथील राजेंद्र प्रसाद स्टेडीयमवर क्रिकेट सामना चालू असताना ही दुर्दैवी दुर्घटना घडली. यावेळी राजेशने 31 धावाही केल्या होत्या. प्रसिध्द डॉक्टर राखी घोडगे यांचे ते पती असून मडगावच्या नगरसेविका शरद प्रभूदेसाई यांचे ते जावई होत. त्यांच्या पश्चात एक मुलगी आहे. उदय़ा सोमवारी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येतील. रणजी सामन्यात गोव्याचे प्रतिधित्व करताना आपल्या शैलीदार फलंदाजीने त्यानी क्रिकेटवेडय़ा रसिकांनाही रिझविले होते.