नवी दिल्ली : खेळाडूला वयाचं बंधन असतं असं म्हणतात. पण काही खेळाडू या गोष्टीला अपवाद ठरतानाही दिसतात. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर खेळाडू अशक्यप्राय गोष्टीही शक्य करून दाखवतात. भारताचा सलामीवीर गौतम गंभीर, हा आता 37 वर्षांचा आहे. या वयात खेळाडू निवृत्ती पत्करून प्रशिक्षण किंवा समालोचन करतात दिसतात. पण गंभीर अजूनही क्रिकेट खेळत आहे. आज त्याने आपल्या निवृत्तीबात एक खुलासा केला आहे.
वीरेंद्र सेहवाग आणि गंभीर यांची सलामीची जोडी चांगलीच गाजली होती. 2011च्या विश्वचषकात जेव्हा सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग झटपट बाद झाले होते, तेव्हा गंभीरने 97 धावांची खेळी साकारून भारताचा डाव सावरला होता. यावेळी जर गंभीरने शतक झळकावले असते तर त्याचे नाव क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले असते. पण गंभीरचे शतक यावेळी फक्त तीन धावांनी हुकले होते.
गंभीर अजूनही क्रिकेट खेळत आहे. काही व्यक्ती गंभीरला निवृत्ती पत्करण्याचा सल्लाही देत आहेत. पम गंभीरने या लोकांना चोख उत्तर दिले आहे. गंभीर म्हणाला की, " जोपर्यंत माझ्याकडून धावा होत आहेत. जोपर्यंत माझी फलंदाजी चांगली होत आहे, तोपर्यंत मी खेळत राहीन. माझा क्रिकेटमधला रस संपल्यावर निवृत्ती पत्करेन. "