नवी दिल्ली-
भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याचा भाजपाचा खासदार गौतम गंभीर नुकतीच आयपीएलमध्ये लखनौ सुपर जाएंट्स संघाचा प्रशिक्षक म्हणून पाहायला मिळाला. खासदार असूनही आयपीएलमध्ये कॉमेंट्री करुन पैसा कमावतो अशी वारंवार टीका गंभीरवर याआधीही करण्यात आली आहे. त्याच्यावर होणाऱ्या या टीकांना अखेर गंभीरनं उत्तर दिलं आहे.
गौतम गंभीरनं एका पत्रकार परिषदेत सांगितलं की स्वत: एक खासगी पातळीवर जन रसोई अभियान चालवतो. यासाठीचा खर्च तो स्वत:च्या कमाईतून करतो. यात तो खासदारीचा निधी वापरत नाही. त्यामुळे अशा योजना मला राबवायच्या असतील तर मला काम करणं गरजेचं आहे.
"एका महिन्यात ५ हजार लोकांना जेवण उपलब्ध करुन देण्यासाठी २५ लाखांचा मला खर्च येतो. वर्षाचे २.७५ कोटी रुपये यासाठी खर्च होतात. २५ लाख रुपये मला लायब्ररी बनवण्यासाठी लागले आहेत. हा सर्व खर्च मी खासदारीच्या निधीतून करत नाही. कारण खासदारीच्या निधीतून ५ हजार लोकांच्या जेवणाचा खर्च भागवला जाऊ शकत नाही. लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी आणि लायब्ररी बनवण्यासाठी मला काम करावं लागतं. मी कॉमेंट्री करतो किंवा आयपीएलमध्ये काम करतो हे सांगण्यास मला अजिबात लाज वाटत नाही. कारण त्यामागे एक मोठा उद्देश आहे", असं गौतम गंभीरनं स्पष्ट केलं.
गौतम गंभीरनं खासदार झाल्यानंतर जन रसोई अभियान सुरू केलं होतं. या रसोई अभियानाअंतर्गत गरीब जनतेला अवघ्या १ रुपयात भरपेट जेवण उपलब्ध करुन दिलं जातं. गंभीर आपल्या लोकसभा मतदार संघात विविध ठिकाणी अशी स्वयंपाक घरं उभारत आहे जिथं गरीबांना दोन वेळचं जेवण उपलब्ध होईल.
आयपीएल २०२२ मध्ये गौतम गंभीर लखनौ सुपर जाएंट्स संघाचा प्रशिक्षक म्हणून दिसला. याआधी त्यानं आयपीएल आणि भारतीय संघाच्या सामन्यांसाठी समालोचक म्हणूनही काम केलं आहे. गौतम गंभीर २०१९ सालच्या निवडणुकीत पूर्वी दिल्लीतून भाजपाच्या तिकीटावर लोकसभा निवडणुकीत निवडून आला आहे.
Web Title: gautam gambhir on why he works in ipl or commentary member of parliament delhi
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.