- सचिन कोरडे
पणजी : नाताळ सणाचा उत्साह असतानाच गोव्याच्या आनंदात आणखी भर पडली. याचे कारण म्हणजे गोव्याच्या क्रिकेट इतिहासातील ऐतिहासिक विजेतेपद. गोव्याच्या मुलींनी कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर मंगळवारी एकच जल्लोष केला. यजमान बंगालचा ३७ धावांनी पराभव करीत गोव्याने बीसीसीआयच्या महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचा चषक पटकाविला. हा चषक ख-या अर्थाने गोव्याला मिळालेला ख्रिसमस गिफ्ट ठरला. गोव्याच्या १४७ धावांचा पाठलाग करताना बंगालने ४३.५ षटकांत ११० धावा केल्या.यापूवीही गोव्याने स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत धडक दिली होती. मात्र, त्यांचा चषक थोडक्यात हुकला होता. यावर्षी मात्र ख्रिसमसच्या मुहूर्तावर गोव्याच्या मुलींनी बाजी मारली. अंतिम सामन्याच्या हिरो ठरल्या त्या कर्णधार शिखा पांडे आणि सुनंदा येत्रेकर. शिखाचे (६६) अर्धशतक आणि सुनंदाचे महत्त्वपूर्ण ३ बळी ही गोव्यातर्फे वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी ठरली. अंतिम फेरीत धडक दिल्याने गोव्याने पुढील वर्षीसाठी एलिट गटात पात्रता मिळवली होती. त्यामुळे गोव्याला दिलासा मिळाला होताच. असे असले तरी गोव्याच्या नजरा विजेतेपदावर होत्या. संघाचा ताळमेळ, एकजूट, वैयक्तिक कामगिरी पाहता गोवा बाजी मारणार, असे वाटत होते; परंतु प्रतिस्पर्धी संघात झुलन गोस्वामी आणि दिप्ती शर्मा या भारतीय संघातील खेळाडूंचा समावेश होता. या दोन्ही खेळाडंूना त्यांनी अपयशी ठरवले आणि आपणच यंदाचे हकदार असल्याचे सिद्ध केले.सामन्यात बंगालने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर विनवी गुरव (२) हिला झुलन गोस्वामीने पायचित करीत त्यांचा निर्णय यशस्वी ठरवला होता. त्यानंतर निकिता मलिक (१२) आणि सुगंधा घाडी (११) या दोघांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. सुगंधा १५ व्या षटकांत बाद झाली. ती बाद होताच भरवशाची सुनंदा येत्रेकर शून्यावर परतल्याने गोव्याला जबर धक्का बसला. संजेला नाईक (९) आणि सिंदिया नाईक (०) या झटपट बाद झाल्या. त्यामुळे गोवा संघ ६ बाद ४४ अशा संकटात सापडला. एका बाजूने कर्णधार शिखा पांडे खेळत होती. दुसºया बाजूने तिला साथ न मिळाल्याने गोवा बॅकफूटवर आला. अखेर शिखा-भारती गावकर ही जोडी जमली. त्यांनी ७ व्या गड्यासाठी महत्त्वपूर्ण ८५ धावांची भागीदारी केली. यात शिखाने आपले ८१ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर ६६ धावांवर ती बाद झाली. तिने ८९ चेंडूंत ८ चौकार आणि १ षटकार ठोकला. शिखा बाद होताच गोव्याचे दोन फलंदाज परतले. त्यात संतोषी राणे (६) आणि दीक्षा गावडे (१) यांचा समावेश होता. भारती गावकर हिने शिखाला चांगली साथ दिली. तिने नाबाद ३२ धावांची खेळी केली. बंगालकडून एन. माजी हिने सर्वाधिक ३, गायत्री मल हिने २ तर झुलन गोस्वामी हिने एक गडी बाद केला.प्रत्युत्तरात, गोव्याच्या संतोषी राणे आणि सुनंदा येत्रेकर यांनी बंगालला दोन धक्के दिले. अपर्णा मंडल (०) आणि दिप्ती शर्मा (१६) धावांवर बाद झाली. सुनंदाने पुन्हा कमाल केली. सलग दोन बळी टिपत तिने बंगालची स्थिती नाजूक केली. तनुश्री सरकार (०) आणि रिचा (८) या दोघी बाद झाल्याने बंगाल ४ बाद ३७ अशा स्थितीत पोहचला. त्यांचा अर्धा संघ ५१ धावांवर तंबूत परतला होता. त्यामुळे गोव्याने सामन्यावर पकड निर्माण केली होती; परंतु परमिता रॉय ही एका बाजूने चांगली खेळत होती. दुसºया बाजूने गोव्याचे गोलंदाज यशस्वी होत होते. गायत्री मल आणि परमिता या जोडीने बंगालच्या विजयाच्या आशा पल्लवीत ठेवल्या. परमिताने ४२ धावा केल्या. अखेर सुनंदाने तिला धावबाद करीत गोव्याला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. गायत्री मल (२०) आणि त्यानंतर झुलन गोस्वामी (७) बाद झाल्या आणि गोव्याने विजयावर शिक्कामोर्तब केले.संक्षिप्त धावफलक : गोवा ५० षटकांत सर्वबाद १४७. फलंदाजी-निकिता मलिक १२, सुगंधा घाडी ११, शिखा पांडे ६६ (८९ षटकांत ८ चौकार, १ षटकार), भारती गावकर नाबाद २०. गोलंदाजी-झुलन गोस्वामी ७-१-१३-१, गायत्री मल १०-४-२०-२, एन. माजी ९-१-३१-३. बंगाल ४३.५ षटकांत सर्वबाद ११०. फलंदाजी-परमिता रॉय ४२, गायत्री मल २०. गोलंदाजी-संतोषी राणे ८.५ -०-२४-३, निकिता मलिक ५-१-१७-१, सुनंदा येत्रेकर ७-२-१३-३. दीक्षा गावडे २-०-१४-१, संजुला नाईक ३-०-१३-१.संतोषीचा निर्णायक बळीपरमिता रॉय आणि गायत्री मल या जोडीने आठव्या गड्यासाठी २९ धावांची भागीदारी केली. बंगाल ७ बाद ६९ अशा नाजुक स्थितीत होता. अशावेळी या दोघी संथ खेळत होत्या. गोव्याच्या गोलंदाज बळीच्या शोधात होत्या. त्यांनी शर्थीने प्रयत्न सुरू ठेवले. अखेर संतोषी राणे हिने ४० व्या षटकांत ही जोडी फोडली. तिने स्वत:च्या चेंडूंवर गायत्रीचा झेल टिपला. गोव्यासाठी हा निर्णायक क्षण ठरला; कारण हा मोठा अडथळा दिसत होता. गायत्री बाद होताच गोव्याच्या गोटात एकच जल्लोष झाला.सुनंदाची गोलंदाजीत चमकगेल्या सामन्यात फलंदाजीत शानदार योगदान देणारी सुनंदा आज अपयशी ठरली. मात्र, गोलंदाजीत तिने ही कसर भरून काढली. रणनीतीनुसार, दिप्ती शर्मा हिला गोव्याच्या गोलंदाजांनी टार्गेट केले होते. त्यात यशस्वी ठरली ती सुनंदाच. तिने १४ व्या षटकांत शिखा पांडेकरवी दिप्तीला झेलबाद केले. सोबतच, तिने एकूण ३ बळी आणि एक धावबाद करीत शानदार योगदान दिले.संघ उद्या गोव्यात....संपूर्ण स्पर्धेत शानदार प्रदर्शन करणा-या गोव्याच्या महिला संघाचे बुधवारी (दि.२७) दुपारी गोव्यात आगमन होईल. या संघाचे जल्लोषी स्वागत करण्यात येईल. या वेळी गोवा क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी उपस्थित असतील. गोव्याच्या संघाला मार्गदर्शन करणा-या प्रशिक्षक देविका पळशीकर यांचे खास अभिनंदन करण्यात येत आहे.