पुणे : पुण्याचा संघ २०१८च्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या मोसमात खेळणार नसला तरी पुणेकरांना या क्रिकेट स्पर्धेतील २ लढतींचा थरार अनुभवता येणार आहे. आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या नवी दिल्लीत शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यानुसार, २३ मे रोजी ‘एलिमिनेटर’ आणि २५ मे रोजी ‘क्वालिफायर टू’ लढत महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) गहुंजे येथील स्टेडियमवर होणार आहेत.एमसीएचे अध्यक्ष अॅड. अभय आपटे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. ते म्हणाले, ‘‘पुण्यासह इंदूर, राजकोट, कोलकता, लखनौ हे संघ ‘एलिमिनेटर’ आणि ‘क्वालिफायर टू’ या महत्वाच्या लढतींचे यजमानपद भूषविण्याच्या शर्यतीत होते. सध्या पुण्याचा संघ या स्पर्धेत खेळत नसला तरी २०१७चे उपविजेते म्हणून आपली दावेदारी सर्वाधिक भक्कम होती. पुण्यात या लढती खेळविण्यावर बैठकीत एकमताने शिक्कामोर्तब झाले.’’संधी लखनौला मिळणार होती...सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची बैठक होण्यापूर्वी या दोन्ही लढतींचे यजमानपद लखनौला देण्याचा निर्णय जवळपास झाला होता. उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेला स्वत:चे स्टेडियमदेखील नाही. तरीही या संघटनेचे राजीव शुक्ला हे आयपीएलचे स्टेडियम असल्याने त्यांनी या लढती लखनौमध्ये खेळविण्याच्या दृष्टीने हालचाली केल्या होत्या. मात्र, गतउपविजेते या नात्याने या दोन्ही लढतींचे यजमानपद मिळणे, हा पुण्याचा हक्क आहे, अशी खंबीर भूमिका अॅड. आपटे यांनी घेतली होती. शिवाय शुक्ला वगळता आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलमधील बहुतेक सर्व सदस्य पुण्याच्या बाजूने होते. याची जाणीव झाल्याने शुक्लांनी लखनौचा आग्रह सोडला आणि प्रत्यक्ष बैठकीत पुण्याला या लढतींचे यजमानपद देण्यावर शिक्कामोर्तब झाले.गतउपविजेते म्हणून पुण्याचा दावा नैसर्गिक होता. या दोन्ही लढती उपांत्य फेरीच्या दर्जाच्या आहेत. यानंतर अंतिम लढत मुंबईत होणार आहे. विजेतेपदासाठी झुंजणाऱ्या दोन्ही संघासाठी प्रवासाच्या दृष्टीने हे योग्य स्थळ आहे. तटस्थ ठिकाण असल्याने दोन्ही लढतींसाठी ताजी खेळपट्टी उपलब्ध होईल. एमसीएने केलेल्या प्रयत्नांना यश आले, याचा विशेष आनंद आहे.- अॅड. अभय आपटे, अध्यक्ष,महाराष्ट्र क्रिकेट संघटना.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- खुशखबर! पुण्यात आयपीएलचे २ सामने! ‘एलिमिनेटर’, ‘क्वालिफायर टू’चा रंगणार थरार
खुशखबर! पुण्यात आयपीएलचे २ सामने! ‘एलिमिनेटर’, ‘क्वालिफायर टू’चा रंगणार थरार
पुण्याचा संघ २०१८च्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या मोसमात खेळणार नसला तरी पुणेकरांना या क्रिकेट स्पर्धेतील २ लढतींचा थरार अनुभवता येणार आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 11:52 PM