आयपीएल-२०२२ मध्ये गुजरात टायटन्सने पदार्पणात विजेतेपदाचा मान पटकाविला. दोन महिने गाजलेल्या १५ व्या सत्रात दहा संघांनी ७४ सामन्यांत रोमांचक खेळाचे दर्शन घडविले. त्यात काही नामवंत खेळाडू ‘फ्लाॅप’ झाले, तर काही नव्या चेहऱ्यांनी स्वकर्तृत्वाची यशोगाथा लिहिली. ‘अनकॅप्ड’ खेळाडूंची क्रिकेटजगताला ओळख झाली. भारतीय क्रिकेटला युवा चेहरे मिळवून देणाऱ्या या लीगमध्ये ज्यांनी चमक दाखवून चाहत्यांना आपलेसे केले, त्यांच्या कामगिरीच्या आधारे ‘लोकमत’ने ‘ड्रीम इलेव्हन-२०२२’ संघ निवड केली आहे. या संघात स्थान मिळालेल्या खेळाडूंचा लेखाजोखा मांडताना ज्यांना स्थान मिळाले नाही ते का? याचाही ऊहापोह करण्यात आला आहे...
दिग्गज ठरले फ्लॉपरोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा हे दिग्गज यंदा लौकिकाला साजेशे खेळले नाहीत. श्रेयस अय्यर, ऋषभ पंत आणि मोहम्मद सिराज यांनीही निराश केले. तीनवेळा पहिल्या चेंडूवर बाद झालेल्या रोहितने एकही अर्धशतकी खेळी केली नाही. त्याने १४ सामन्यांत २६८ धावा केल्या. विराट दोन वर्षांपासून खेळात माघारला. त्याने लीगमध्ये १६ सामन्यांत ३४१ धावा केल्या. २५ च्या सरासरीने धावा काढणारा कोहली मोक्याच्या क्षणी बॅकफूटवर आला. जडेजाने नेतृत्वाची चमक तर दाखविली नाहीच शिवाय तो गोलंदाजी- फलंदाजीतही कमालीचा माघारला. पंतने १४ सामन्यांत ३४० धावा केल्या, मात्र टप्प्याटप्प्यात. वेगवान सिराजला १५ सामन्यांत केवळ नऊ गडी बाद करता आले.
अनकॅप्ड खेळाडूंची धूमवेगवान उमरान मलिक, तसेच राहुल त्रिपाठी यांनी संघात स्थान मिळविले, तर डावखुरा वेगवान गोलंदाज मोहसिन खान हा १२वा खेळाडू म्हणून संघात आहे. उमरानने १४ सामन्यांत २२ गडी बाद केले, तर राहुलने १४ सामन्यांत ४१३ धावा कुटल्या. मोहसिनने संधी मिळताच लखनौकडून गोलंदाजीतील क्षमता सिद्ध केली.
केवळ सहा संघस्थान पटकाविलेल्या खेळाडूंमध्ये राजस्थान रॉयल्सचे दोन, लखनौचे तीन, आरसीबीचे दोन, गुजरातचे दोन, पंजाबचा एक आणि सनरायजर्सचे दोन खेळाडू आहेत. याचा अर्थ आयपीएल जिंकणाऱ्या संघांपैकी केवळ राजस्थान आणि यंदाचा विजेत्या गुजरातचे खेळाडू स्थान मिळवू शकले. पाच वेळेचा विजेता मुंबई, चार वेळा जेतेपद पटकाविणारा सीएसके, दोन वेळेचा विजेता केकेआर आणि २०२१चा उपविजेता दिल्ली या चार संघांतील एकही खेळाडू यात स्थान मिळवू शकलेला नाही.
ईशानची एक धाव ३.६५ लाख
ईशान किशनला मुंबई इंडियन्सने १५.२५ कोटींत रिटेन केले. झारखंडच्या या खेळाडूने १४ सामन्यांत ४१८ धावा केल्या. सातत्यपूर्ण खेळात अपयशी ठरलेल्या या खेळाडूची एक धाव ३.६५ लाख रुपयात पडली. ईशान तिसऱ्या सामन्यानंतर लवकर बाद होत गेला. यामुळे इतके पैसे मोजायला नको होते, अशीही त्याच्यावर टीका झाली.