मुंबई - भारताने आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहजपणे प्रवेश केला. आतापर्यंत अपराजित राहिलेल्या भारताला सुपर फोर गटाच्या अखेरच्या लढतीत दुबळ्या अफगाणिस्तानने बरोबरीत रोखले. या एका सामन्याचा अपवाद वगळता भारताने प्रत्येक सामन्यात विजयी कामगिरी केली. अफगाणिस्तानविरुद्ध बरोबरी झाल्यानंतर संघाच्या प्रदर्शनावर चाहतेही निराश झाले होते. मात्र या वेळी निराश झालेला टीम इंडियाचा लहानगा चाहता अर्जन याचे छायाचित्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. यावर भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगने ट्विट करत अर्जनची समजूत काढलीच; शिवाय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने थेट अर्जनला फोन करून त्याला खूश करण्याचा प्रयत्न केला.हरभजनने अर्जनचा फोटो सोशल मीडियावर शेअर करताना म्हटले होते, ‘कोइ ना पुत्ता रोना नही है, फायनल आपा ही जीतेंगे.’ हरभजनच्या या ट्विटनंतर क्रिकेट चाहत्यांनीही अर्जनचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न केला. यावर एका चाहत्याने लिहिले की, ‘या निकालाने उदास नको होऊ. धोनीने जेव्हा - जेव्हा सामना बरोबरीत खेळला आहे, तेव्हा तेव्हा जेतेपद भारतानेच जिंकले आहे.’तसेच भुवनेश्वर कुमारने थेट अर्जनशीच फोनवर संवाद साधला. या वेळी त्याने अर्जनची निराशा दूर करत त्याला नवा विश्वासही दिला. अर्जनचे वडील अमरप्रीत सिंग यांनी ट्विटरवर हरभजनचे आभार व्यक्त करताना म्हटले, ‘अर्जन आता खूश असून शुक्रवारी होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी सज्ज आहे. मी भुवनेश्वर कुमारचेही आभार मानू इच्छितो की त्याने फोनवर संवाद साधून अर्जनची निराशा दूर केली. आपण नक्की पुनरागमन करू आणि शुक्रवारी विजय आपलाच असेल. टीम इंडियाला खूप खूप शुभेच्छा..!’
- Cricket Buzz»
- बातम्या»
- हरभजन, भुवीने दूर केली लहानग्या चाहत्याची निराशा
हरभजन, भुवीने दूर केली लहानग्या चाहत्याची निराशा
भारताने आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहजपणे प्रवेश केला. आतापर्यंत अपराजित राहिलेल्या भारताला सुपर फोर गटाच्या अखेरच्या लढतीत दुबळ्या अफगाणिस्तानने बरोबरीत रोखले.
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 4:34 AM