मुंबई : हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल यांच्यावरील निलंबन बीसीसीआयने अखेर मागे घेतले आहे. त्यामुळे पंड्या आणि राहुल यांचा न्यूझीलंडमध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सी. के. खन्ना यांनी पंड्या आणि राहुल यांना मदत केल्याचे म्हटले जात आहे.
काही दिवसांपूर्वी खन्ना यांनी बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीला एक पत्र लिहिले होते. यामध्ये त्यांनी पंड्या आणि राहुल यांच्यावरील निलंबन मागे घ्यावे, त्यांना संघाबरोबर न्यूझीलंडमध्ये पाठवण्यात यावे, असे लिहिले होते.
खन्ना यांनी पत्रामध्ये काय लिहिले होते, ते पाहा...हार्दिक आणि राहुल यांनी चूक केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यांना ऑस्ट्रेलियाचा दौरा अर्धवट सोडून माघारी बोलवण्यात आले. हार्दिक आणि राहुल या दोघांनीही बिनशर्त माफी मागितली आहे. जोपर्यंत या दोघांच्या बाबतीत निर्णय येत नाही. तोपर्यंत त्यांना खेळण्याची संधी देण्यात यावी. त्यांना लवकरच न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाण्याची परवानगी देण्यात यावी.