Herschelle Gibbs Jay Shah Controversy: काश्मीर प्रीमियर लीगचा (Kashmir Premier League) वाद कोणापासून लपलेला नाही. या हंगामाच्या सुरुवातीलाच दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज हर्षल गिब्स याने BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि सचिव जय शाह यांच्यावर खळबळजनक आरोप केला. मी काश्मीर प्रीमियर लीगमध्ये सहभागी होऊ नये, जर तसं केलं तर भारतीय क्रिकेट बोर्डासोबत तुला यापुढेही कधीही काम करता येणार नाही, असा त्यांनी संदेश पाठवल्याचा दावा हर्षल गिब्सने केला. एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून तो काश्मीर प्रिमियर लीगशी संबंधित आहे. त्यात हर्षल गिब्सने हा दावा केल्याचं स्पष्ट होत आहे.
गिब्सने इंस्टाग्रामवर काश्मीर प्रीमियर लीग सीझन 2 सुरू होणार असल्याबद्दल एक पोस्ट शेअर केली. त्यानंतर अनेक चाहत्यांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली. पोस्ट शेअर करताना हर्षल गिब्सने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'दुबईमध्ये KPL T20 चा सीझन 2 लाँच झाला. त्याचा पुन्हा एकदा भाग होण्यासाठी मी उत्सुक आहे आणि आनंदी आहे.'
KPL च्या या वर्षीच्या उद्घाटन कार्यक्रमात गेल्या वर्षीच्या घटनेबद्दल बोलताना हर्शल गिब्स म्हणाला, "दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचा संचालक ग्रॅम स्मिथकडून एक निरोप मिळाला. त्याला जय शाह यांनी माझ्यासाठी एक संदेश दिला होता. तो संदेश असा होता की जर मी काश्मीरला गेलो, तर मला भारतात काम करू दिलं जाणार नाही. मला हा संदेश काश्मीरला येण्याच्या दोन आठवड्यांपूर्वी देण्यात आला", असा दावा गिब्सने केला.
"त्यानंतर मी स्वत: सौरव गांगुलीशी संपर्क साधला आणि त्याला सांगितलं की तुम्ही लोक या गोष्टीला राजकीय रंग देत आहात. मी राजकीय माणूस नाही. मी सौरव गांगुलीला हेदेखील सांगितलं की ही गोष्ट अन्यायकारक आहे आणि सौरव गांगुलीनेही ही गोष्ट राजकीय असल्याचं मान्य केलं", असा दावादेखील हर्षल गिब्सने केला.