मुंबई : गेल्या वर्षात भारताच्या क्रिकेट संघाने दमदार कामगिरी केली. पण आता पुढच्या वर्षीसाठीही भारताचा संघ सज्ज झाला आहे. पण पुढच्या वर्षी भारतीय संघ नेमके किती सामने खेळणार आहे, हे तुम्हाला माहिती आहे का... जाणून घ्या पुढच्या वर्षीच्या सामन्यांचे वेळापत्रक.
नवीन वर्षात भारताची पहिली मालिका ही श्रीलंकेबरोबर होणार आहे. श्रीलंकेचा संघ भारतात येणार असून यावेळी तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात येणार आहे. त्यावेळी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तीन ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.
भारताचा नवीन वर्षातील पहिला परदेशी दौरा हा न्यूझीलंडचा असणार आहे. भारतीय संघ जानेवारीमध्ये न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. हा दौरा २४ जानेवारी ते ४ मार्च या कालावधीमध्ये होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ पाच ट्वेन्टी-२० सामने खेळणार आहे. त्याचबरोबर दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांचाही यामध्ये समावेश असेल.
भारतीय संघ न्यूझीलंडमधून परतल्यावर काही दिवसांमध्येच त्यांना दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करायचे आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये १२ ते १८ मार्च या कालावधीमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेनंतर आयपीएल २०२० ला सुरुवात होणार आहे.
या वर्षातील आयपीएलला सर्वात जास्त महत्व असेल. कारण या आयपीएलनंतर काही महिन्यांमध्येच ट्वेन्टी-२० विश्वचषक खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे या आयपीएलमध्ये जे खेळाडू चमकतील त्यांची भारताच्या संघात वर्णी लागू शकते, असे म्हटले जात आहे. आयपीएलनंतर भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाऊ शकतो. कारण भारताने २०१७नंतर एकदाही श्रीलंकेचा दौरा केलेला नाही. या दौऱ्यात भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये वनडे आणि ट्वेन्टी-२० सामने खेळवले जाऊ शकतात. श्रीलंकेचा दौरा संपल्यावर भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेत उतरणार आहे.
आशिया चषक हा पाकिस्तानमध्ये खेळवण्यात येणार आहे आणि भारतीय संघ पाकिस्तानध्ये जाणारा नाही, हे बीसीसीआयने यापूर्वीही स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे जर ही स्पर्धा खेळवयची असेल तर दुसरे ठिकाण शोधावे लागणार आहे. आशिया चषकानंतर भारतीय संघ सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात विश्वविजेत्या इंग्लंडशी भिडणार आहे. दोन्ही देशांमध्ये प्रत्येकी तीन वनडे आणि ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे.
इंग्लंडबरोबरची मालिका संपल्यावर भारतीय संघ ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळायला जाणार आहे. ही स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. पण या विश्वचषकापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्याचा विचार सुरु आहे. विश्वचषकानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्येच थांबणार आहे, कारण त्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चार कसोटी आणि तीन वनडे सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. ही भारताची या वर्षातील शेवटची स्पर्धा असेल, असे म्हटले जात आहे.