भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातला तिसरा वन डे सामना मंगळवारी खेळवण्यात आहे. न्यूझीलंडनं दोन सामने जिंकून मालिका खिशात घातली आहे. त्यामुळे तिसरा सामना हा त्यांच्यासाठी केवळ औपचारिक आहे, तर दुसरीकडे टीम इंडियाला निदान हा सामना जिंकून इभ्रत वाचवण्यासाठी घाम गाळावा लागणार आहे. या मालिकेनंतर टीम इंडिया दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यासाठी टीम इंडियाच्या कसोटी संघातील सदस्य न्यूझीलंडमध्ये आधीच दाखल झाले आहेत. येथील वातावरणाशी एकरूप होता व्हावं त्यामुळे भारत अ संघासोबत दोन अनऑफिशियल चार दिवसीय सामने खेळवण्यात आले.
दोन सामन्यांतील दुसऱ्या सामन्यात अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी भारत अ संघाचे प्रतिनिधित्व केलं. दुसऱ्या सामन्यात अजिंक्यनं खणखणीत नाबाद शतक झळकावले. भारत अ संघानं हा सामना अनिर्णीत राखला. न्यूझीलंड अ संघाच्या 9 बाद 390 ( डाव घोषित) धावांच्या प्रत्युत्तरात भारत अ संघानं 5 बाद 467 धावा केल्या. सामन्याच्या चौथ्या व अखेरच्या दिवशी रहाणेनं शतक झळकावलं.
न्यूझीलंड अ संघानं प्रथम फलंदाजी कररताना 9 बाद 390 धावा केल्या. डॅरील मिचेल ( 103*) चे नाबाद शतक आणि ग्लेन फिलिप्स (65) व डेन क्लेव्हर ( 53) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंड अ संघानं हा पल्ला गाठला. मोहम्मद सीराज, संदीप वॉरियर, आर अश्विन आणि आवेश खान यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात कर्णधार हनुमा विहारी आणि शुबमन गिल यांनी 111 धावांची सलामी दिली. विहारी 59 धावांत माघारी परतला. गिलनं 190 चेंडूंत 15 चौकार व 2 षटकार खेचून 136 धावा केल्या. गिलनं पहिल्या अनऑफिशियल सामन्यात 83 व 204* धावा चोपल्या होत्या.
चेतेश्वर पुजारा 53 धावा करून माघारी परतला. त्यानंतर रहाणे व विजय शंकर यांनी तुफान फटकेबाजी केली. रहाणेनं 148 चेंडूंत 14 चौकार व 1 षटकार खेचून नाबाद 101 धावा केल्या. विजयनं 66 धाव केल्या. भारतानं 5 बाद 467 धावा करताना सामना अनिर्णित राखला.