हैदराबाद - पुन्हा एकदा कमी धावांचे यशस्वी संरक्षण करुन सनरायझर्स हैदराबादने रॉयल चँलेंजर्स बँगलोरचे कडवे आव्हान ५ धावांनी परतावले. या रोमांचक विजयासह हैदराबादने गुणतालिकेतील आपले अव्वल स्थान भक्कम करताना १६ गुणांची कमाई केली. आरसीबी ६ गुणांसह सहाव्या स्थानी कायम आहे.कमी धावसंख्येच्या या सामन्यात पुन्हा एकदा हैदराबादने आपला हिसका दाखवला. आपली ताकद गोलंदाजीमध्ये असल्याचे सिद्ध करताना हैदराबादने आरसीबीच्या स्टार फलंदाजांना जेरीस आणले. आरसीबीने प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादचा डाव २० षटकात १४६ धावांवर संपुष्टात आणला. यावेळी आरसीबी सहज बाजी मारणार अशीच आशा होती. परंतु, हैदराबादने आपल्या आरसीबीला २० षटकात ६ बाद १४१ धावांवर रोखताना सामन्याचे चित्रच पालटले. पार्थिव पटेलने (१३ चेंडूत २० धावा) आरसीबीला आक्रमक सुरुवात करुन दिली. मात्र, शाकिब अल हसनने त्याला बाद करुन आरसीबीच्या फलंदाजीला सुरुंग लावला. यानंतर कर्णधार विराट कोहलीने चौफेर फटकेबाजीला सुरुवात केली. तो खेळपट्टीवर असेपर्यंत आरसीबीची विजयी मार्गावर वाटचाल सुरु होती. परंतु, मनन वोहरा (८) व कोहली पाठोपाठ परतल्यानंतर हैदराबादने पकड मिळवली. कोहलीने ३० चेंडूत ५ चौकार व एका षटकारासह ३९ धावा केल्या. एबी डिव्हिलियर्स (५), मोइन अली (१०) स्वस्तात परतल्यानंतर मनदीप सिंग (२१*) व कॉलिन डी ग्रँडेहोम (३३) यांनी संघाच्या आशा कायम राखल्या होत्या. मात्र सिद्धार्थ कौल, संदीप शर्मा व भुवनेश्वर कुमार यांनी अखेरच्या षटकांमध्ये अचूक मारा करत आरसीबीला फटकेबाजीची संधीच दिली नाही.तत्पूर्वी, प्रमुख फलंदाज अपयशी ठरल्यानंतर कर्णधार केन विलियम्सनच्या अर्धशतकाच्या जोरावर हैदराबादने समाधानकारक मजल मारली. त्याने ३९ चेंडूत ५ चौकार व २ षटकारांसह ५६ धावा केल्या. शाकिब अल हसननेही ३२ चेंडूत ५ चौकारांसह ३५ धावा काढल्या, तर फलंदाज सपशेल अपयशी ठरले. टिम साऊदी आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी ३ बळी घेत हैदराबादला रोखण्यात मोलाचे योगदान दिले. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलकसनरायझर्स हैदराबाद : २० षटकात सर्वबाद १४६ धावा (केन विलियम्सन ५६, शाकिब अल हसन ३५; मोहम्मद सिराज ३/२५, टिम साऊदी ३/३०) वि.वि. रॉयल चँलेंजर्स बँगलोर : २० षटकात ६ बाद १४१ धावा (विराट कोहली ३९, कॉलिन डी ग्रँडेहोम ३३; शाकिब अल हसन २/३६.)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- हैदराबादने काढली आरसीबीची हवा, ‘विराट सेना’ ५ धावांनी पराभूत
हैदराबादने काढली आरसीबीची हवा, ‘विराट सेना’ ५ धावांनी पराभूत
पुन्हा एकदा कमी धावांचे यशस्वी संरक्षण करुन सनरायझर्स हैदराबादने रॉयल चँलेंजर्स बँगलोरचे कडवे आव्हान ५ धावांनी परतावले. या रोमांचक विजयासह हैदराबादने गुणतालिकेतील आपले अव्वल स्थान भक्कम करताना १६ गुणांची कमाई केली.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 1:16 AM