चेन्नई : प्रतिकूल परिस्थितीतही शांतचित्ताने निर्णय घेणे ही महेंद्रसिंग धोनीची खरी ओळख आहे. या आगळ्यावेगळ्या गुणांमुळे तो इतर खेळाडूंच्या तुलनेत महान ठरतो. तथापि, तोदेखील दडपणात असतोच. कामगिरी करण्याची त्याच्या मनातही सारखी भीती असते.धोनीने एमफोरद्वारे आयोजित एका आॅनलाईन कार्यक्रमात गुरुवारी भाग घेतला. मानसिक आरोग्याबाबत मौल्यवान मते मांडली. तो म्हणाला, ‘भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंची मानसिक शक्ती थोडीशी कमी पडते हे सत्य अजूनपर्यंत खूप लोकांना मान्य नाही. आपण खेळाडूंच्या या आजाराला सरसकट मानसिक ताण ठरवतो. अनेकदा फलंदाज खेळपट्टीवर जातो, तेव्हा पहिल्या पाच ते १० चेंडूंचा सामना करताना तो थोडासा घाबरलेला असतो. त्याच्या हृदयाचे ठोके वेगाने पडत असतात. कोणीच हे उघडउघड मान्य करत नाही, पण सगळ्यांनाच तसे वाटत असते. अशा परिस्थितीत काय करावे? खरे तर ही खूप छोटी समस्या आहे; पण काही खेळाडू प्रशिक्षकाला सांगायलादेखील घाबरतात. कोणत्याही खेळात खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्यात चांगले नाते आवश्यक असते.’
एमफोर ही संस्था माजी क्रिकेटपटू एस. बद्रिनाथ याने श्रवणकुमार यांच्या भागीदारीने सुरू केली आहे. या संस्थेमार्फत खेळाडूंच्या मानसिक समस्यांवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने विविध दिग्गजांकडून मार्गदर्शन केले जाते. मागच्यावर्षी झालेल्या एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेला धोनी स्वत:चे मत मांडताना पुढे म्हणाला, ‘खेळाडूंचे मानसिक आरोग्य उत्तम राहावे यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षकांची गरज असते. अशा प्रकारचे तज्ज्ञ प्रशिक्षक जर केवळ १५ दिवसांसाठी संघासोबत राहिले, तर त्या १५ दिवसात ते केवळ स्वत:च्या अनुभवावरून मार्गदर्शन करू शकतात. मात्र संघासाठी त्यांची सतत सेवा घेतल्यास त्यांना खेळाडूंचा नीट अंदाज येईल. त्यांचा मार्गदर्शन करण्याचा अंदाज खेळाडूंच्या गरजेनुसार बदलेल.’‘मी फलंदाजीला खेळपट्टीवर जातो त्यावेळी पहिल्या ५-१० चेंडूंचा सामना करताना माझ्या हृदयाची स्पंदने सारखी धडधडत असतात; मात्र अशी कबुली जगातला कोणताही फलंदाज देणार नाही. माझ्यावर दडपण आलेले असते, कामगिरी होईल की नाही, अशी मनात भीती असते, ही सर्वांसाठी सारखी स्थिती आहे. आपली उणीव उघड होईल, या भीतीपोटी कुणीही कुणाशी या गोष्टी शेअर करीत नाही.’-महेंद्रसिंग धोनी