चेन्नई : कसोटी स्पेशालिस्ट म्हणून चेतेश्वर पुजाराच्या प्रतिष्ठेमुळे गेल्या काही वर्षांत त्याला इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही; पण रोहित शर्मा व विराट कोहली यांच्यासारख्या खेळाडूंकडून बोध घेतल्यानंतर आता आगामी मोसमात चेन्नई सुपरकिंग्सतर्फे (सीएसके) छाप पाडण्यास उत्सुक आहे. अनेक वर्षे आयपीएलच्या लिलावात ‘अनसोल्ड’ राहिलेल्या पुजाराला यंदा सीएसकेने ५० लाख रुपयांच्या बेस प्राईसमध्ये विकत घेतले आहे.नेहमी पुजाराच्या स्ट्राईक रेटबाबत प्रश्न उपस्थित होतात. यात सुधारणा करण्यासाठी कर्णधार कोहली व उपकर्णधार रोहितप्रमाणे टायमिंगवर अवलंबून राहील. विलियम्सनसारख्या खेळाडूकडून शिकता येईल, त्याप्रमाणे स्टीव्हन स्मिथकडूनही. ते केवळ चांगले फटके खेळून धावा वसूल करतात आणि त्याचसोबत काही नवे करण्याचा प्रयत्न करीत असतात असे पुजारा म्हणाला. पुजाराने पुढे सांगितले, ‘यश मिळविण्यासाठी काहीतरी नवे करावे लागेल आणि तशी माझी मानसिकता आहे; पण त्यासोबत अचूक फटके मारूनही धावा काढता येतात. तुम्हाला स्वत:चे फटके चांगले खेळण्याची गरज आहे’ कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्याला वाटत होते की, टी-२० क्रिकेटच्या गरजेनुसार बदल केला तर त्याची कसोटी कारकीर्द प्रभावित होईल; पण आता तसे नाही.’पुजाराने सांगितले की, द्रविडने म्हटले होते की, तू वेगवेगळे फटके खेळण्याचा प्रयत्न केलास तरी तुझ्या स्वाभाविक खेळामध्ये बदल होणार नाही.’ (वृत्तसंस्था)
‘स्ट्राईक रेटबाबत चर्चा करताना मी पॉवर हिटर नसल्याचे मला मान्य आहे. पण, त्यासोबत तुम्ही विराटसारख्या खेळाडूकडून शिकत असता. रोहित पूर्णपणे पॉवर हिटर नाही; पण चेंडूला अचूक टायमिंगसह मारणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये मी याचा अनुभव घेतला आहे.’- चेतेश्वर पुजारा