- रोहित नाईक
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळासह (बीसीसीआय) माझे संबंध कधीच बिघडले नाही. जेव्हा माझ्यावर बंदीची कारवाई झाली, तेव्हा मला स्वत:ला निर्दोष सिध्द करायचे होते. ती एक गोष्ट सोडली तर, कधीही बीसीसीआय आणि माझ्यामध्ये अडचणी आल्या नाहीत, असे भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दिन यांनी सांगितले.
बुधवारी मुंबईत अझरुद्दिन यांच्यावर आधारीत एका मोबाईल गेमची घोषणा करण्यात आली. यावेळी अझरुद्दिन यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. नुकताच अझरुद्दिन यांनी बीसीसीआयला पत्र पाठवून करोडो रुपयांची पेन्शन देण्याची मागणी केली होती. याबाबत विचारले असता अझरुद्दिन म्हणाले की, ‘बीसीसीआयच्या निर्णयाबाबत मी सकारात्मक आहे. मी कधीच कोणत्याही बाबतीत नकारात्मक विचार केलेला नाही. मी पाठवलेल्या पत्राचा बोर्डने आपल्या अजेंडामध्ये समावेश केला, यावरुन बोर्डही सकारात्मक असल्याचे दिसते. त्यामुळे लवकरात लवकर हा निर्णय होईल अशी आशा आहे.’
नुकताच केरळ उच्च न्यायालयाने फिक्सिंग प्रकरणात अडकलेला भारताचा वेगवान गोलंदाज एस. श्रीशांत याच्यावरील बंदी उठविण्याचा आदेश दिला. याबाबत अझरुद्दिन म्हणाले, ‘न्यायालयाच्या निर्णयानंतर श्रीशांतच्या पुनरागमनाविषयी अडचणी यायला नको. तरी तो ४ वर्ष खेळापासून दूर राहिला असल्याने तंदुरुस्ती टिकवणे आणि उच्च दर्जाची कामगिरी करण्याचे मुख्य आव्हान त्याच्यापुढे असेल. माझ्यामते, श्रीशांत भारताच्या सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक असून तो चेंडू स्विंग करण्यात तरबेज आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर बीसीसीआयही सकारात्मक निर्णय घेईल अशी आशा आहे.’
काही दिवसांपुर्वीच टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विराट सेनेचे कौतुक करताना सध्याचा संघ सर्वोत्तम भारतीय संघ असल्याचे वक्तव्य केले. याविषयी विचारले असता अझरुद्दिन म्हणाले की, ‘आमच्या काळातील संघानेही चांगली कामगिरी केली होती. परंतु, तेव्हाचे क्रिकेट आणि आत्ताचे क्रिकेट यात खूप बदल झाला आहे. त्यामुळे कोणत्याही काळातील संघांची तुलना करणे खूप अवघड आहे.’
सध्याचा भारतीय संघ खूप मजबूत आहे. विविध परिस्थितीमध्ये खेळण्याचा त्यांना अनुभव आहे. कर्णधार म्हणून विराट कोहलीपुढे आता चांगले आव्हान असेल. त्याला कर्णधार म्हणून मोठी संधी असेल. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि आॅस्टेÑलिया येथील वातावरण, खेळपट्ट्या एकदम वेगळे असणार. त्यामुळे या सर्व परिस्थितींशी जुळवुन घेण्याचे मुख्य आव्हान त्याच्यापुढे आणि संघापुढे असेल. - मोहम्मद अझरुद्दिन
कुंबळेने योग्य निर्णय घेतला
माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना स्वत:हून राजीनामा द्यावा लागला ते खूप वाईट झाले, असे सांगताना अझरुद्दिन म्हणाले, ‘मी कुंबळेसह खूप खेळलो असून त्याला चांगला ओळखून आहे. त्याच्यासोबत जे काही झाले त्याचे मलाही खूप वाईट वाटले. कुंबळेने आपल्या स्वाभिमानाला अधिक महत्त्व देऊन स्वत:हून दूर झाला. त्यामुळे मला वाटते की त्याने योग्य निर्णय घेतला. प्रत्येक अडचण सोडवता येते, पण ती योग्य प्रकारे सोडवता आली पाहिजे.’
Web Title: I have never lost my relationship with the BCCI: Mohammad Azharuddin
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.