बुधवारी झालेल्या उपांत्य लढतीत भारताने न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव करत आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ४ बाद ३९७ धावांपर्यंत मजल मारली होती. तर न्यूझीलंडचा संघ या आव्हानाचा जोरदार पाठलाग केल्यानंतर ३२७ धावांवर गारद झाला होता. या सामन्यात विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी केलेली शतकी खेळी आणि मोहम्मद शमीने केलेली भेदक गोलंदाजी भारताच्या विजयात निर्णायक ठरली होती. शमीने न्यूझीलंडच्या ७ फलंदाजांना बाद केले होते. या कामगिरीनंतर शमीचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. त्याचदरम्यान, दिल्ली पोलिसांनी शमीबाबत एक खास ट्विट केलं आहे. त्याची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे.
५७ धावा देत ७ किवी फलंदाजांना गारद केल्यापासून मोहम्मद शमी सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आला आहे. या कामगिरीवरून दिल्ली पोलिसांनी मुंबई पोलिसांना टॅग करत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक अशी पोस्ट लिहिली आहे जी आता व्हायरल होत आहे. त्यात दिल्ली पोलिसांनी लिहिलं आहे की, मुंबई पोलीस आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्ही मोहम्मद शमीकडून आज करण्यात आलेल्या हल्ल्यांसाठी त्याला अटक करणार नाही.
दिल्ली पोलिसांच्या या ट्विटला मुंबई पोलिसांनीही तेवढ्यात सफाईदारपणे उत्तर दिले आहे. त्यात लिहिले आहे की, तुम्ही अगणित लोकांचं हृदय चोरल्याबाबतची कलमं लावायला विसरला आहात. तसेच सहआरोपींची यादीही दिलेली नाही. साहजिकच मुंबई पोलिसांचा इशारा या सामन्यातील शतकवीर असलेल्या विराट कोहली आणि श्रेयस अय्यर तसेच धडाकेबाज खेळी करणारे शुभमन गिल आणि के.एल. राहुल यांच्याकडे होता. आता बघता बघता ही पोस्ट व्हायरल झाली आहे.