दुबई : आयसीसीच्या ट्वेन्टी-20 क्रमवारीत भारताच्या खेळाडूंनी दमदार मजल मारल्याचेच पुढे आले आहे. कारण भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने दुसरे स्थान पटकावले आहे, तर या स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या वॉशिंग्टन सुंदरने भरारी घेतली आहे. निदाहास ट्रॉफीचे भारताने बांगलादेशला पराभूत करून जेतेपद पटकावले आहे.
आयसीसीच्या ट्वेन्टी-20 क्रमवारीतील गोलंदाजांच्या विभागात चहलने 12 स्थानांची कमाई केली असून त्याने दुसऱ्या स्थानाला गवसणी घातली आहेत. या क्रमवारीत त्याचे हे सर्वोत्तम स्थान आहे. सुंदरने तर या क्रमवारीत सर्वात मोठी मजल मारली आहे. सुंदरने 151 स्थानांची भरारी घेत थेट 31वे स्थान पटकावले आहे. यावेळी चहलच्या खात्यात 706 आणि सुंदरच्या खात्यात 496 गुण आहेत.
या दोन्ही फिरकीपटूंनी स्पर्धेतील पाचही सामन्यांमध्ये गोलंदाजी केली. या दोघांनी प्रत्येकी आठ बळी मिळवले, सुंदरने जास्तीत जास्त षटके पॉवर प्लेमध्ये टाकली, पण तरीही त्याने चहलपेक्षा कमी धावा दिल्या आहेत. भारताचे वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट आणि शार्दुल ठाकूर यांनी अनुक्रमे 52 आणि 76वे स्थान पटकावले आहे.
निदाहास ट्रॉफीच्या अंतिम फेरीत अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकत दिनेश कार्तिकने अतुलनीय, अशीच कामगिरी केली आहे. त्यालाही क्रमवारीत चांगलीच बढती मिळाली आहे. दिनेशने क्रमवारीत 126 स्थानांची कमाई करत 95वे स्थान पटकावले आहे. त्याच्या खात्यात आतापर्यंतचे सर्वाधिक असे 246 गुण आहेत.