बांगलादेशने भेदक मारा करत भारताच्या धावसंख्येला वेसण घातल्याचे पाहायला मिळाले. पण शेफाली वर्मा आणि जेमिमा रॉड्रीगेझ यांनी साकारलेल्या दमदार खेळींमुळे भारताला १४२ अशी सन्मानजनक धावसंख्या उभारता आली.
बांगलादेशने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. यावेळी भारताला दुसऱ्या षटकात पहिला धक्का बसला. पण त्यानंतर शेफाली आणि जेमिमा यांनी दमदार फलंदाजी करत भारताला अर्धशतक पूर्ण करून दिले. पण या दोघींनाही अर्धशतक झळकावण्यात अपयश आहे.
शेफाली आणि जेमिमा ही जोडी भारताला मोठी धावसंख्या उभारून देइल, असे वाटत होते. पण शेफाली बाद झाली आणि ही जोडी फुटली. शेफालीने यावेळी आक्रमक फलंदाजी करत १२ चेंडूंत २ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ३९ धावा केल्या.
शेफाली बाद झाल्यावर जेमिमाने संघाची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. पण जेमिमाला दुसऱ्या टोकाकडून चागंली साथ मिळाली नाही. दुसऱ्या टोकाकडून भारतीय फलंदाज बाद होत राहीले आणि या गोष्टीचे दडपण जेमिमावर आले. या दडपणाखाली जेमिमाही धावचीत झाली. जेमिमाने दोन चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ३४ धावा केल्या.