भारतीय महिलांच्या क्रिकेट संघाने ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पण आज सुरु असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या साखळी सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी केली आहे. भारताच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत श्रीलंकेच्या संघाला ११३ धावांत रोखले आहे.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय चांगलाच अंगलट आल्याचे पाहायला मिळत आहे. कारण भारताच्या गोलंदाजांनी तिखट मारा करत त्यांना ११३ धावांवर रोखण्यात यश मिळवले आहे.
तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूंवर श्रीलंकेला पहिला धक्का बसला. त्यानंतर त्यांनी सातत्याने आपले फलंदाज गमावले आणि त्यांना १२० धावांची वेसही ओलांडता आली नाही. श्रीलंकेच्या सात फलंदाजांना यावेळी दोन अंकी धावसंख्याही उभारता आली नाही. भारताकडून राधा यादवने चार, तर राजेश्वरी यादवने दोन फलंदाजांना बाद केले.