मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला. इंग्लंड आणि वेल्स येथे 30 मे ते 14 जुलै या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. समितीने निवडलेल्या या संघात दिनेश कार्तिकची निवड ही सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारी ठरली. महेंद्रसिंग धोनीला राखीव यष्टिरक्षक म्हणून गेले कित्येक दिवस रिषभ पंतच्याच नावाची चर्चा होती आणि पंतच वर्ल्ड कपमध्ये खेळेल असा दावा केला जात होता. पण, त्या सर्व दाव्यांना फोल ठरवले. या निर्णयामागे निवड समितीचा दीर्घकालीन विचार आहे.
वर्ल्ड कप जिंकण्यासाठी इंग्लंडमधील वातावरणाशी जुळवून घेणारे खेळाडू संघात असणे गरजेचे होते. पंतने इंग्लंडमध्ये एकही वन डे सामना खेळलेला नाही आणि कार्तिकने इंग्लंडमध्ये झालेल्या अनेक आयसीसी स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. कार्तिकच्या बाबतीत हे नजरअंदाज करून चालणारे नक्कीच नाही.
कार्तिक हा पंतसारखा हार्ड हिटर नाही, परंतु यष्टिमागे त्याची कामगिरी ही नक्कीच वरचढ आहे. महेंद्रसिंग धोनी काही कारणास्तव खेळू शकला नाही, तर कार्तिक हा इंग्लंडच्या वातवरणात यष्टिमागे उत्तम पर्याय ठरु शकतो. पंतकडे प्रचंड प्रतिभा असल्याचा उल्लेख निवड समिती प्रमुखांनी केला आणि त्यामुळे वर्ल्ड कपनंतर पंतला भारतीय संघात सातत्याने संधी मिळू शकते. कदाचित धोनी वर्ल्ड कप स्पर्धेनंतर निवृत्तीही स्वीकारू शकतो.
त्यामुळे पुढील ( 2020 ट्वेंटी-20, 2021 ट्वेंटी-20 आणि 2023 वन डे ) वर्ल्ड कप स्पर्धा लक्षात घेता पंतच संघातील महत्त्वाचा यष्टिरक्षक ठरणार आहे. तो पर्यंत पंतकडे भरपूर अनुभव येईल. पंत सध्या 21 वर्षांचा आहे आणि तो पुढील तीन वर्ल्ड कप नक्कीच खेळू शकतो.
कार्तिकला मात्र तिसऱ्या प्रयत्नात वन डे वर्ल्ड कप संघात स्थान मिळवण्यात यश आले आहे. 2004 मध्ये त्याने वन डे संघात पदार्पण केले. त्यानंतर 2007 च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपमध्ये धोनीला राखीव यष्टिरक्षक म्हणून त्याने संघात स्थान पटकावले, परंतु त्याला एकही सामना खेळता आला नाही. 2011 आणि 2015 मध्ये त्याला संभाव्य संघातही स्थान मिळाले नाही. त्यामुळे तिसऱ्या प्रयत्नात त्याला वर्ल्ड कपची बस पकडण्यात यश आले खरे, परंतु त्याला खेळण्याची संधी मिळेल की नाही, याचे उत्तर येणारा काळच देईल.