लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघाने मंगळवारी बांगलादेशवर विजय मिळवून उपांत्य फेरीतील स्थानावर शिक्कामोर्तब केले. भारताने 13 गुणांसह गुणतालिकेत दुसरे स्थान पक्के केले आहे. या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताला आतापर्यंत एका सामन्यात पराभव पत्करावा लागला आणि तोही यजमान इंग्लंडकडून. या पराभवानं भारतीय संघाचे काही नुकसान झाले नसले तरी पाकिस्तानसाठी हा मोठा धक्काच होता. भारताने तो सामना जिंकला असता तर त्यांच्या उपांत्य फेरीच्या मार्गातील मोठा अडथळाच दूर झाला असता. पण, तसे झाले नाही आणि पाकिस्तानचा मार्ग अधिक बिकट बनला आहे. पाक संघाचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी भारतीय संघाच्या इंग्लंडविरुद्धच्या कामगिरीवर नाराजी प्रकट केली.
वर्ल्ड कप स्पर्धेच्या गुणतक्त्यानुसार ऑस्ट्रेलियाने 8 सामन्यांत 7 विजयासह 14 गुणांची कमाई केली आहे, तर भारतीय संघाने 8 सामन्यांत 6 विजयासह 13 गुणांची कमाई केली आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत हे अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहेत. तिसऱ्या व चौथ्या स्थानावर सध्या न्यूझीलंड ( 11) आणि इंग्लंड ( 10) आहेत. या दोन संघांसोबतच उपांत्य फेरीच्या शर्यतीत पाचव्या स्थानावर असलेला पाकिस्तानही ( 9) आहे. त्यामुळे चेस्टर ले स्ट्रीट येथे होणाऱ्या इंग्लंड - न्यूझीलंड या सामन्यावर पाकिस्तानचेही भवितव्य अवलंबून आहे.
ते म्हणाले,'' भारतीय संघाने कसे खेळावे, यावर आमचे नियंत्रण नाही. पण, या स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी दमदार झाली होती आणि इंग्लंडविरुद्ध त्यांच्या विजयाची अपेक्षा होती. पण, भारतीय संघ पराभूत झाल्याने, निराश झालो. भारतीय संघ पाकिस्तानच्या बाजूनं उभा राहिला नाही.''
न्यूझीलंड, पाकिस्तान आणि इंग्लंड यांचा प्रत्येकी एक सामना शिल्लक आहे. पाक आणि इंग्लंड यांना अनुक्रमे बांगलादेश आणि न्यूझीलंड यांचा सामना करायचा आहे. त्यामुळे दोन्ही संघांना हे सामने जिंकावेच लागणार आहेत. पाकिस्तानने विजय मिळवल्यास त्यांच्या खात्यात 11 गुण होतील, तर इंग्लंडने न्यूझीलंडला पराभूत केल्यास ते 12 गुणांसह उपांत्य फेरीत प्रवेश करतील. पण, चौथ्या स्थानासाठी मग पाकिस्तान व न्यूझीलंड यांच्यात चुरस पाहायला मिळेल. कारण दोन्ही संघांच्या खात्यात प्रत्येकी 11 गुण होतील. अशा परिस्थितीत नेट रनरेट चांगला असलेला संघ उपांत्य फेरीत प्रवेश करेल.
Web Title: ICC World Cup 2019 : Disappointed Virat Kohli and Co. didn't stand up for Pakistan in WC: Mickey Arthur on India's loss to England
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.