लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : रोहित शर्माच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने मंगळवारी बांगलादेशवर विजय मिळवून उपांत्य फेरीतील प्रवेशावर शिक्कामोर्तब केले. ऑस्ट्रेलियानंतर वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवणारा भारत हा पहिलाच संघ ठरला आहे. आता उर्वरित दोन स्थानांसाठी चुरस पाहायला मिळणार आहे. पण, आज होणाऱ्या इंग्लंड आणि न्यूझीलंड या सामन्यातील निकालानंतर ही चुरस संपुष्टात येऊ शकते. आजच्या सामन्यावर तीन संघांचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे आजचा सामना हा उपांत्य फेरीतील दोन संघ निश्चित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
वर्ल्ड कप स्पर्धेच्या गुणतक्त्यानुसार ऑस्ट्रेलियाने 8 सामन्यांत 7 विजयासह 14 गुणांची कमाई केली आहे, तर भारतीय संघाने 8 सामन्यांत 6 विजयासह 13 गुणांची कमाई केली आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत हे अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहेत. तिसऱ्या व चौथ्या स्थानावर सध्या न्यूझीलंड ( 11) आणि इंग्लंड ( 10) आहेत. या दोन संघांसोबतच उपांत्य फेरीच्या शर्यतीत पाचव्या स्थानावर असलेला पाकिस्तानही ( 9) आहे. त्यामुळे चेस्टर ले स्ट्रीट येथे होणाऱ्या इंग्लंड - न्यूझीलंड या सामन्यावर पाकिस्तानचेही भवितव्य अवलंबून आहे.
जाणून घेऊया कसे...
न्यूझीलंड, पाकिस्तान आणि इंग्लंड यांचा प्रत्येकी एक सामना शिल्लक आहे. पाक आणि इंग्लंड यांना अनुक्रमे बांगलादेश आणि न्यूझीलंड यांचा सामना करायचा आहे. त्यामुळे दोन्ही संघांना हे सामने जिंकावेच लागणार आहेत. पाकिस्तानने विजय मिळवल्यास त्यांच्या खात्यात 11 गुण होतील, तर इंग्लंडने न्यूझीलंडला पराभूत केल्यास ते 12 गुणांसह उपांत्य फेरीत प्रवेश करतील. पण, चौथ्या स्थानासाठी मग पाकिस्तान व न्यूझीलंड यांच्यात चुरस पाहायला मिळेल. कारण दोन्ही संघांच्या खात्यात प्रत्येकी 11 गुण होतील. अशा परिस्थितीत नेट रनरेट चांगला असलेला संघ उपांत्य फेरीत प्रवेश करेल.
नेट रन रेटचा विचार करता न्यूझीलंड ( 0.572) आघाडीवर आहे. पाकिस्तानचा नेट रनरेट - 0.792 असा आहे. त्यामुळे किवींच्या पराभवासह त्यांना बांगलादेशवर मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. किवींना मागील सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला आहे. कागारूंचे 243 धावांचे लक्ष पार करताना किवींचा संपूर्ण संघ 157 धावांत तंबूत परतला. त्यामुळे त्यांना उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी इंग्लंडविरुद्ध विजय मिळवणे हा पर्याय आहे, पण जर पराभव झाल्यास तो मोठ्या फरकाने नसावा, याची काळजी मात्र ते घेऊ शकतात. दुसरीकडे पाकिस्तानला बांगलादेशवर मोठा विजय मिळवावा लागेल.
Web Title: ICC World Cup 2019 : Pakistan teams eyes on England Vs New Zealand match, know why?
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.