लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. बांगलादेशविरुद्धच्या लढतीत सफाईदार विजय मिळवून भारतीय संघ 13 गुणांसह दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. शिखर धवन आणि विजय शंकर यांच्या दुखापतीनंतरही भारतीय संघाची वाटचाल जेतेपदाच्या दिशेनं सुरू आहे. संघाची कामगिरी पाहता वर्ल्ड कप जेतेपद दूर नाही, असेही बोलले जात आहे. पण, या आनंदायी मार्गात मिठाचा खडा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला उपांत्य फेरीच्या लढतीला मुकावे लागू शकते. साखळी फेरीतील अखेरच्या लढतीत श्रीलंकेविरुद्ध कोहलीकडून 'ती' एक चूक पुन्हा घडल्यास भारतासाठी तो मोठा धक्का ठरू शकतो.
बांगलादेशविरुद्धच्या लढतीत कोहली वैतागलेला पाहायला मिळाला आणि रागाच्या भरात त्यानं मैदानावर पंचांशी हुज्जत घातली. बांगलादेशच्या डावातील 11 व्या षटकात मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर सौम्या सरकार पायचीत झाल्याचे अपील करण्यात आले. मैदानावरील पंच मॅरीइस इरास्मसने नाबाद असा निर्णय दिला आणि कोहलीनं DRS घेण्याचा निर्णय घेतला. तिसरे पंच अलीम दार यांनीही तपासणी केल्यानंतर चेंडू बॅटीला लागून पॅडवर आदळल्याचे स्पष्ट दिसत होते आणि त्यामुळे त्यांनी इरास्मस यांचा निर्णय कायम राखला.
DRS गमावल्यानंतर कोहलीला राग अनावर झाला आणि त्याने पंचांशी हुज्जत घालायला सुरुवात केली. कोहलीचे हे वागणं वारंवार दाखवण्यात आले. वर्ल्ड कप स्पर्धेत कोहलीचा असा प्रताप दुसऱ्यांदा पाहायला मिळाला. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात गरजेपेक्षा अधिक अपील केल्यामुळे त्याला मॅच फीमधील 25 टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागली होती. सप्टेंबर 2016 नंतर नवीन नियमावली जाहीर झाल्यानंतर कोहलीकडून असे दुसऱ्यांदा घडले. जानेवारी 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याने पंचांशी वाद घातला होता आणि त्यासाठी त्याला दोन डीमेरिट गुण देण्यात आले होते.
आयसीसीच्या नियमानुसार 24 महिन्यांच्या कालावधीत एखाद्या खेळाडूचे चार किंवा त्यापेक्षा अधिक डीमेरिट्स गुण झाल्यास त्याचे निलंबनाच्या गुणांत रुपांतर होते आणि खेळाडूवर बंदीची कारवाई होते. असे दोन निलंबनाचे गुण म्हणजे एक कसोटी किंवा दोन वन डे किंवा दोन ट्वेंटी-20 यापैकी जे आधी असेल अशी कारवाई होते. त्यामुळे कोहलीकडून अशी चूक पुन्हा झाल्यास तो उपांत्य किंवा अंतिम सामन्याला मुकू शकतो.