लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : यंदाच्या विश्वचषकात भारताने एकही सामना गमावलेला नाही. पण आम्ही भारताला धूळ चारणार, असे वक्तव्य बांगलादेशचा अनुभवी खेळाडू शाकिब अल हसनने केले आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना २ जुलैला होणार आहे.
सध्याच्या घडीला बांगलादेशचा संघ चांगल्या फॉर्मात आहे. त्यांनी दोन मातब्बर संघांवर विजय मिळवला आहे. सोमवारी बांगलादेशने अफगाणिस्तानवर विजय मिळवत उपांत्य फेरीच्या दिशेने कूच केली आहे. या सामन्यात शकिबने अर्धशतकासह पाच बळी मिळवण्याची किमया साकारत इतिहास रचला होता. त्यामुळे नेत्रदीपक विजयानंतर बांगलेदशची नजर भारताविरुद्धच्या सामन्यावर आहे.
बांगलादेशने यापूर्वी २००७ साली झालेल्या विश्वचषकात भारताला पराभूत केले होते. बांगलादेशविरुद्धच्या पराभवामुळे भारताचे या स्पर्धेतील आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले होते. २०१५ साली झालेल्या विश्वचषकात बांगलादेशने भारताला कडवी झुंजज दिली होती.
भारताविरुद्धच्या सामन्याबाबत शकीब म्हणाला की, " भारताने आतापर्यंत विश्वचषकात एकही सामना गमावलेला नाही. विश्वचषकाचे ते प्रबळ दावेदार आहेत. पण आमचा संघही चांगल्या फॉर्मात आहे आणि आमच्याकडेही अनुभव आहे. त्यामुळे भारतीय संघालाही आम्ही पराभूत करू शकतो आणि यासाठी आम्ही सक्षम आहोत."
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात शकिब अल हसनची अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळाली. या सामन्यात शकिबने अर्धशतक तर झळकावलेच, पण त्याचबरोबर अफगाणिस्तानचा अर्धा संघही गारद केला. पण क्रिकेट विश्वात अशी कामगिरी करणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे. बांगलादेशने अफगाणिस्तानवर 62 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 262 धावा केल्या. यावेळी शकिबने 51 धावांची खेळी साकारली, तर मुशफिकर रहिमने 83 धावांची सर्वाधिक खेळी साकारली. या सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरला तो शकिब अल हसन. आतापर्यंत क्रिकेट विश्वचषकात अर्धशतक आणि पाच बळी मिळवणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे. असा पराक्रम करणारा पहिला खेळाडू आहे भारताचा युवराज सिंग. युवराजने 2011 साली झालेल्या विश्वचषकात आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक आणि पाच बळी मिळवण्याची किमया साधली होती.