अहमदाबाद - आयपीएल २०२२च्या आज होणाऱ्या अंतिम लढतीत गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्सचे संघ आमने-सामने येणार आहेत. गुजरातने क्वालिफायर १ मध्ये राजस्थानला नमवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर राजस्थान रॉयल्सने क्वालिफायर-२ मध्ये एलिमिनेटरमधील विजेता संघ असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर मात करून अंतिम फेरीचे तिकीट पक्के केले होते. गुजरात टायटन्सचा संघ पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळत आहे. तर राजस्थान रॉयल्स या स्पर्धेचा पहिला विजेता संघ आहे.
दोन्ही संघांनीही या मोसमात धडाकेबाज कामगिरी केलेली असल्याने फॅन्सकडून या सामन्याची उत्साहाने वाट पाहिली जात आहे. पण या लढतीवर पावसाने पाणी फिरवू नये, अशी फॅन्सची अपेक्षा आहे. आयपीएलचा अंतिम सामना हा गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला तर काय होईल आणि पावसामुळे सामना रद्द झाला तर गुजरात आणि राजस्थानमधील कुठला संघ विजेता ठरेल, याबाबत जाणून घेण्याची क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता आहे.
आयपीएलमधील अंतिम सामना रात्री आठ वाजता सुरू होणार आहे. जर खराब हवामानमुळे सामना सुरू होण्यास उशीर झाला तर सामना हा रात्री १०.१० वाजता सुरू होऊ शकतो. तसेच जर सामना दोन तास उशिरा सुरू झाला तरी षटकांमध्ये कपात केली जाणार नाही. जर काही कारणाने अंतिम सामना ५-५ षटकांचा करण्यात आल्यास रात्री १२.२६ पर्यंत सामना सुरू करावा लागेल. तसेच खराब हवामानामुळे सामन्यात एकही चेंडू फेकला गेला नाही, तर त्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.
नव्या नियमानुसार पावसामुले जर आयपीएल २०२२ चा अंतिम सामना मध्येच थांबवावा लागला तर दुसऱ्या दिवशी खेळ जिथे थांबला होता तिथूनच पुढील खेळाला सुरुवात होईल. तसेट नाणेफेकीनंतर खेळ थांबला आणि एकाची चेंडूचा खेळ झाला नसेल तर राखीव दिवशी पुन्हा एकदा नाणेफेक घेतली जाईल. तसेच राखीव दिवशी पावसामुळे खेळ थांबवावा लागला, तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. तसेच पावसामुळे सुपर ओव्हर खेळवता आली नाही तर मग गुणतक्त्यातील क्रमवारीनुसार विजेत्या संघाची घोषणा होईल. म्हणजेच गुणतक्त्यात पुढे असलेला संघ विजेता ठरेल. यंदाच्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स अव्वलस्थानी होता, तर राजस्थानचा संघ दुसऱ्या स्थानावर होता.