पल्लेकेल : श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये खेळण्याची संधी न मिळालेल्या भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्माकडे एकदिवसीय क्रिकेट संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. उपकर्णधारपदी निवड झाल्याचा आनंद व्यक्त करतानाच रोहितने कसोटी मालिकेतील कसर एकदिवसीय मालिकेमध्ये भरुन काढण्याचा निर्धारही केला आहे.
रोहितने म्हटले की, ‘भारतीय संघाच्या उपकर्णधारपदी निवड होणे अत्यंत सन्मानाची बाब आहे. दहा वर्षांपुर्वी मी केवळ भारताकडून खेळण्याविषयी विचार करत होतो. उपकर्णधार म्हणून आता खूप चांगले वाटत आहे. जेव्हा २० आॅगस्टला आम्ही मालिकेतील पहिला सामना खेळण्यास उतरु तेव्हा माझ्यावर विशेष जबाबदारी असेल आणि त्यासाठी मी सज्ज आहे. सध्या मी याविषयी जास्त विचार करत नसून या क्षणाचा मी आनंद घेत आहे.’
रोहितच्या नेतृत्त्वाखाली मुंबई इंडियन्सने आयपीएलचे तीनवेळा विजेतेपद पटकावले आहे. याविषयी त्याने सांगितले की, ‘हे पुर्णपणे वेगळे क्रिकेट आहे. आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुर्ण वेगळे असते. मात्र, तरी उत्साह आणि उर्जा पहिल्याप्रमाणेच आहे. त्यामुळेच फारकाही बदलले नाही. मी भारतीय संघात उपकर्णधार असून संघात कर्णधार आहे. माझी भूमिका पडद्यामागे थोडी मागे असेल. परंतु, जेव्हा मी उपकर्णधार म्हणून मैदानावर उतरेल तेव्हा खूप उत्साहित असेल.’
आतापर्यंतच्या आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीविषयी रोहित म्हणाला की, ‘माझ्या कारकिर्दीतील हे दहा वर्ष खूप लवकर संपली. मी अनेक चढ-उतार पाहिले, परंतु प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीमध्ये असे चढ-उतार होत असतात. यातून प्रत्येकजण खूप काही शिकत असतो. मी नेहमीच भारताकडून खेळण्यासाठी प्रतीक्षा केली. क्रिकेटचा कोणताही प्रकार असो, मी नेहमीच भारताकडून खेळण्याच्या प्रतीक्षेत असतो.’
Web Title: I'm ready for 'one-day'
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.