Join us  

Video: किंग कोहलीचा सणसणीत चौकार; गोलंदाज झाला अवाक् पण विराट मात्र नाराज

विराटच्या या फटक्याची चांगलीच चर्चा रंगली, पण विराट मात्र समाधानी दिसला नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 8:36 AM

Open in App

Virat Kohli Video, IND vs AFG 2nd T20: भारतीय संघाने तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही अफगाणिस्तानचा पराभव केला. इंदूरच्या होळकर स्टेडियमवर भारतीय फलंदाजांकडून दमदार कामगिरी झाली. यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे यांच्या स्फोटक अर्धशतकांच्या जोरावर भारताने 173 धावांचे लक्ष्य सहज गाठले. या विजयासह भारताने मालिकेतही अजिंक्य आघाडी घेतली. या सामन्यामुळे विराट कोहलीचे टी२० संघात पुनरागमन झाले. पण त्याच्या खेळीतील एका घटनेची सध्या चर्चा रंगली आहे.

२०२२ च्या टी२० विश्वचषकात विराट कोहलीने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफच्या डोक्यावरुन एक षटकार खेचला होता. विराटने तो चेंडू समोरच्या दिशेने मारून षटकार लगावला होता. विराटने अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यातही असाच शॉट खेळला. दमदार फटका मारल्यामुळे चौकार गेला. पण चौकार जाऊनही विराट नाराज दिसला. फटका मारताना चेंडूला तेवढी उसळी नव्हती आणि चेंडू बॅटच्या खालच्या भागाला लागला. हातात बॅट फिरली आणि चेंडू नीट मारता न आल्याने विराटला चौकारावर समाधान मानावे लागले.

नवीन उल हकला हा फटका मारूनही विराट कोहलीला आनंद झाला नाही. शॉट खेळल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. त्याला षटकाराची अपेक्षा असताना चौकार गेल्यामुळे तो निराश झाल्याचे दिसले.

दरम्यान, विराटने १६ चेंडूत २९ धावांची खेळी केली. त्यात ५ चौकारांचा समावेश होता. विराटला अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन उल हकनेच बाद केले. सामन्यात यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने २६ चेंडू राखून विजय मिळवला. तिसरा आणि अंतिम सामना १७ जानेवारीला बेंगळुरूमध्ये खेळवला जाईल.

टॅग्स :भारत-अफगाणिस्तानविराट कोहलीटी-20 क्रिकेटयशस्वी जैस्वालअफगाणिस्तान