सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताचा कर्णधार विराट कोहली हा आक्रमक असल्याचे साऱ्यांनाच माहिती आहे. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेन्टी-20 लढतीत अशी एक गोष्ट घडली की कोहली गालातल्या गालात हसायला लागला.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्याचे दुसरे षटक युवा गोलंदाज खलील अहमद टाकत होता. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचने कव्हर्सच्या दिशेने चेंडू मारला. तिथे कोहली उभा होता. फिंच फटका मारल्यावर धावा करण्यासाठी सरसावला होता. कोहलीने चेंडू थेट स्टम्पच्या दिशेने मारला. चेंडू थेट स्टम्पला लागला आणि कोहलीने जोरदार अपील करायला सुरुवात केली. फिंच आता बाद झाला असेच कोहलीला वाटले. पण तिसऱ्या पंचांनी जेव्हा पाहिले तेव्हा फिंच नाबाद असल्याचे दिसले. त्यानंतर मात्र कोहली गालातल्या गालात हसल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर फिंच 28 धावांवर बाद झाला.