India vs Australia, 4th Test Day 4 : संकटावर मात करून मोहम्मद सिराजनं ( Mohammed Siraj) हा ऑस्ट्रेलिया दौरा संस्मरणीय बनवला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दाखल होताच मायदेशातून वडिलांच्या निधनाची बातमी आली. त्याही परिस्थितीत त्यानं मन घट्ट करून संघासोबत राहण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद शमी दुखापतग्रस्त झाल्यानंतर सिराजला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. त्यात चौथ्या कसोटीपूर्वी जसप्रीत बुमराह व आर अश्विन हे अनुभवी गोलंदाज जायबंदी झाले आणि दोन कसोटींचा अनुभव असलेल्या सिराजकडे जलदगती गोलंदाजाचे नेतृत्व सांभाळण्याची जबाबदारी आली. त्यातही न खचता त्यानं दमदार कामगिरी केली. दुसऱ्या डावात त्यानं पाच विकेट्स घेत कमालच केली आणि कर्णधार अजिंक्य रहाणेनं ( Ajinkya Rahane) विशेष कृतीनं त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.
मोहम्मद सिराज ( Mohammed Siraj) आणि शार्दूल ठाकूर ( Shradul Thakur) यांनी मदत करणाऱ्या खेळपट्टीवर दबदबा गाजवताना ऑस्ट्रेलियाला धक्के दिले. मोहम्मद सिराजनं ७३ धावांत ५ विकेट्स घेतल्या, तर शार्दूलनं ६१ धावांत ४ विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २९४ धावांवर गडगडला आणि टीम इंडियाला आता विजयासाठी कराव्या लागतील ३२८ धावा.
चौथ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला चार धक्के दिले. शार्दूल व वॉशिंग्टन यांनी सलामीवीरांना माघारी पाठवल्यानंतर मोहम्मद सिराजनं एकाच षटकात दोन फलंदाज बाद केले. २५व्या षटकात शार्दूलनं टीम इंडियाला पहिलं यश मिळवून दिलं. मार्कस हॅरीसला ( ३८) त्यानं बाद केलं. पुढच्याच षटकात वॉशिंग्टननं डेव्हिड वॉर्नरला ( ४८) पायचीत केलं. स्टीव्ह स्मिथ व मार्नस लाबुशेन आक्रमक खेळ करताना दिसले आणि अजिंक्य रहाणेनं त्यांना रोखण्यासाठी मोहम्मद सिराजला पुन्हा गोलंदाजीला बोलावले. अजिंक्यची ही चाल यशस्वी ठरली आणि सिराजनं एकाच षटकात लाबुशेन ( २५) व मॅथ्यू वेड ( ०) यांना माघारी पाठवले.
स्टीव्ह स्मिथला ५५ धावांवर माघारी जावे लागले. यानंतर शार्दूल ठाकूरनं ऑसींना धक्का दिला. कॅमेरून ग्रीन ( ३७) ठाकूरच्या गोलंदाजीवर रोहित शर्माच्या हाती झेल देऊन माघारी परतला. पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ काही काळ थांबला होता. त्यानंतर शार्दूल व सिराज यांनी ऑसींना धक्का देण्याचे सत्र कायम ठेवले. पॅट कमिन्स एकाबाजूनं फटकेबाजी करत ऑसींची आघाडी वाढवत होता आणि त्यानं नाबाद २८ धावा केल्या.
या सामन्यात ५ विकेट्स घेणाऱ्या मोहम्मद सिराजच्या हाती अजिंक्य रहाणेनं चेंडू सोपवला आणि खेळपट्टी सोडताना टीम इंडियाला लीड करण्याची संधी दिली. त्याच्या या कृतीचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
Web Title: IND vs AUS : Ajinkya Rahane hands over the match ball to Mohammed Siraj who leads India off the Gabba pitch
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.