India vs Bangladesh, 1st Test : बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत दुसऱ्या दिवशी श्रेयस अय्यरचे ( Shreyas Iyer) शतक हुकले, परंतु आर अश्विन व कुलदीप यादव या जोडीने कमाल केली. अश्विन आणि कुलदीप यांनी २०० चेंडूंत ९२ धावांची भागीदारी केली. अश्विनने ११३ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह ५८ धावा केल्या. या भागीदारीमुळे भारताने पहिल्या डावात ४००+ धावा उभ्या केल्या. कुलदीपने ११४ चेंडूंत ५ चौकारांसह ४० धावा केल्या.
काल 'बेल्स' मुळे वाचला, म्हणून आज गोलंदाजाने स्टम्पच उखडून टाकला; श्रेयस अय्यर कसा बाद झाला?
शुबमन गिल ( २०), लोकेश राहुल ( २२) व विराट कोहली ( १) हे तिघे फलकावर ४८ धावा असताना माघारी परतले. रिषभ पंत व चेतेश्वर पुजारा यांनी भारताचा डाव सावरला. पण, मेहिदी हसन मिराजने रिषभला ( ४६) माघारी जाण्यास भाग पाडले. पुजाराने ७८वी धाव पूर्ण करताच कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांत आठवे स्थान पटकावले. त्याने दीलिप वेंगसरकरांचा विक्रम मोडला. पुजारा-श्रेयस यांच्या ३१७ चेंडूंत १४९ धावांच्या भागीदारीला तैजूल इस्लामची नजर लागली अन् पुजारा २०३ चेंडूंत ११ चौकारांसह ९० धावांवर बाद झाला. दिवसाच्या अखेरच्या षटकात अक्षर पटेल ( १३) LBW झाला अन् भारताच्या ६ बाद २७८ धावा झाल्या होत्या. ( India vs Bangladesh Live Scorecard )
अय्यर ८२ धावांवर नाबाद खेळत होता आणि त्याला कसोटीच्या दुसऱ्या दिवशीही जीवदान मिळाले. पण, इबादत होसैनने धैर्य सोडले नाही आणि त्याने अप्रतिम चेंडू टाकून श्रेयसचा ८६ धावांवर त्रिफळा उडवला. अय्यरने १९२ चेंडूंत १० चौकारांच्या मदतीने या धावा केल्या. २०२२ या वर्षात भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करण्याचा विक्रम श्रेयस अय्यरने नावावर केला. अय्यर माघारी परतल्यानंतर भारताचा डाव झटपट गुंडाळता येईल असे बांगलादेशला वाटले होते, परंतु आर अश्विन व कुलदीप यादव यांनी कमाल केली. अश्विनने वैयक्तिक अर्धशतक झळकावताना आठव्या विकेटसाठी कुलदीपसह भारताच्या धावांची गती वाढवली. कसोटीत आठव्या क्रमांकावरील अश्विनचे हे ९वे ५०+ धावा ठरल्या आणि त्याने रविंद्र जडेजाचा ( ८) विक्रम मोडला. कपिल देव १३ वेळ ५०+ धावा करून अव्वल स्थानावर आहेत.
अश्विन आणि कुलदीप यांनी २०० चेंडूंत ९२ धावांची भागीदारी केली. मेहिदी सहनच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका मारण्याच्या प्रयत्नात अश्विन स्टम्पिंग झाला. उमेश यादवने आक्रमक खेळ करताना भारताच्या धावसंख्येत महत्त्वाची भार घातली. भारताने पहिल्या डावात ४०४ धावा केल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"