India vs England Test Match Live : रिषभ पंत ( Rishabh Pant) आज पुन्हा एकदा भारतासाठी संकटमोचक ठरला. ५ बाद ९८ अशा अवस्थेत सापडलेल्या टीम इंडियाला रिषभ व रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) या जोडीने संजीवनी दिली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी विक्रमी २२२ धावांची भागीदारी करताना ५ बाद ९८ वरून संघाला ६ बाद ३२० अशा मजबूत स्थितीत आणून ठेवले. रिषभ व जडेजा यांची ही भागीदारी इंग्लंडविरुद्ध सहाव्या विकेटसाठी भारताकडून झालेली सर्वोत्तम भागीदारी ठरली. रिषभ १११ चेंडूंत १९ चौकार व ४ षटकारांसह १४६ धावांवर बाद झाला. त्याचे हे इंग्लंडमधील दुसरे शतक ठरले आणि १४५ वर्षांच्या कसोटी इतिहासात आतापर्यंत इंग्लंडमध्ये पाहुण्या संघाच्या यष्टिरक्षकाला एकपेक्षा अधिक शतक झळकावता आले नव्हते.
२३ चेंडूंत कुटल्या १०० धावा, रिषभ पंतचा नुसता राडा; मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम, Video
शुबमन गिल ( १७), चेतेश्वर पुजारा ( १३), हनुमा विहारी ( २०), विराट कोहली ( ११ ) व श्रेयस अय्यर ( १५) हे झटपट माघारी गेल्यामुळे भारताची अवस्था ५ बाद ९८ अशी झाली होती. जेम्स अँडरसनने यापैकी तीन, तर पॉट्सने दोन विकेट्स घेतल्या. त्यानंतर रिषभ पंत व रवींद्र जडेजा ही डावखुरी जोडी खेळपट्टीवर नांगर रोवून उभी राहिली. जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, मॅथ्यू पॉट्स, जॅक लिच, बेन स्टोक्स या गोलंदाजांना अपयश आलेले असताना जो रूटने ही भागीदारी तोडली. रुटने शतकवीर रिषभला बाद केले. त्यानंतर शार्दूल ठाकूर बाद झाला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने ७ बाद ३३८ धावा केल्या होत्या. जडेजा ८३ धावांवर खेळतोय.
- रिषभने आजच्या सामन्यात सर्वात कमी वयात १०० षटकार खेचणाऱ्या भारतीय फलंदाजासह, सर्वात जलद २०००+ कसोटी धावा करणाऱ्या यष्टिरक्षकाचा विक्रम नावावर केला.
- १४५ वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात इंग्लंडमध्ये पाहुण्या संघातील यष्टीरक्षकाने दोन शतक आतापर्यंत कधीच झळकावली नव्हती. पण, रिषभच्या आजच्या शतकाने वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला.
- रिषभने ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका व इंग्लंड येथे चार कसोटी शतकं झळकावली आहेत. एडबस्टन येथे कसोटी शतक झळकावणारा रिषभ हा सचिन तेंडुलकर ( १२२) व विराट कोहली ( १४९) यांच्यानंतरचा तिसरा भारतीय ठरला. रिषभने १४६ धावा करून तेंडुलकरचा एडबस्टनवरील विक्रम मोडला.
- रिषभ व जडेजा यांनी द्विशतकी भागीदारी पूर्ण करून आणखी एक विक्रम नोंदवला. इंग्लंडमध्ये पाच किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावरील ही भारताकडून झालेली सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी २०१८मध्ये रिषभ व लोकेश राहुल यांनी ओव्हल कसोटीत २०४ धावांची भागीदारी केली होती.
- सुनील गावस्कर व चेतन चौहान यांनी १९७९साली एडबस्टन येथे १२४ धावांची भागीदारी केली होती. त्यानंतर रिषभ-जडेजाने येथे शतकी भागीदारी केली. जो रूटने ही विकेट मिळवून दिली.