India vs England, 3rd ODI, Pune: भारतीय संघानं इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडसमोर विजयासाठी ३३० धावांचं आव्हान दिलं. भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात निराशाजनक झाली होती. भुवनेश्वर कुमारनं सामन्याच्या पहिल्याच षटकात जेसन रॉयला क्लीन बोल्ड करत माघारी धाडलं. त्यानंतर जॉनी बेअरस्टोला देखील भुवीनं पायचीत करत भारताला दुसरं यश मिळवून दिलं. पण भारतीय चाहत्यांच्या नजरा खिळल्या होत्या ते इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सच्या विकेटकडे.
बेन स्टोक्सला स्वस्तात बाद करण्याची संधी देखील भारतीय संघाला मिळाली होती. तीही भुवनेश्वर कुमारनं अप्रतिम गोलंदाजी करत स्टोक्सला आपल्या जाळ्यात ओढलं होतं आणि त्याला मिड ऑन दिशेनं अतिशय सोपा झेल देण्यास त्याला भाग पाडलं होतं. पण हार्दिक पंड्याकडून स्टोक्सचा झेल सुटला आणि सर्वांना धक्का बसला. स्टोक्सचा झेल सुटल्यानंतर भारतीय संघातील सर्व खेळाडूंचे चेहऱ्यावरचे हावभाव बदलले होते. तिथं डगआऊटमध्येही चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं.
हार्दिक पंड्याकडून सहसा झेल सुटत नाही आणि आज तर अगदी सोपा झेल सुटल्यानं काहीक्षण संघाचा सपोर्ट स्टाफ आणि खेळाडूंना विश्वासच बसला नाही. स्वत: हार्दिक देखील खूप निराश झालेला पाहायला मिळाला. बेन स्टोक्ससारख्या घातक फलंदाजाचा झेल सुटल्याची सल हार्दिकच्या मनाला छळत होती. पुढे टी नटराजनच्या फुलटॉस चेंडूवर बेन स्टोक्सनं मोठा फटला लगावण्याचा प्रयत्न केला पण यावेळी शिखर धवननं कोणतीही चूक न करता झेल टीपला आणि स्टोक्सला माघारी धाडलं. भारतीय संघाला मोठं यश मिळालं होतं. धवननं स्टोक्सचा झेल टिपताच हार्दिकनं मैदानात खाली बसून सुटलेल्या झेलबाबत माफी मागितली आणि स्टोक्सची विकेट गेल्यानं सुटकेचा नि:श्वास सोडला.