IND vs IRE 2nd T20I Live Marathi : ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन यांनी रचलेल्या मजबूत पायावर रिंकू सिंग व शिवम दुबे यांनी धावांचा डोंगर उभा केला. रिंकूला मागील सामन्यात फलंदाजी करण्याची संधी मिळाली नव्हती, परंतु आज तो आला अन् आयपीएल स्टाईल गाजला. त्याच्या पटकेबाजीने भारताला १८५ धावांपर्यंत पोहोचवले. त्याने शेवटच्या पाच चेंडूंत आयर्लंडमध्ये वादळ आणले.
यशस्वी जैस्वाल (१८) आणि तिलक वर्मा ( १) माघारी परतल्यानंतर संजू सॅमसन व ऋतुराज गायकवाड यांनी दमदार फटकेबाजी केली. संजूने ४० धावा ( २६ चेंडू, ५ चौकार व १ षटकार) केल्या आणि त्याने ऋतुराजसह ४९ चेंडूंत ७१ धावांची भागीदारी केली. ऋतुराज ४३ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ५८ धावांवर झेलबाद झाला. रिंकू सिंग आणि शिवम दुबे यांनी २८ चेंडूंत ५५ धावांची भागीदारी करून भारताला मोठा पल्ला गाठून दिला. रिंकूने २१ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ३८ धावा चोपल्या, तर शिवम २२ धावांवर नाबाद राहिला आणि भारताने ५ बाद १८५ धावा केल्या.
प्रत्युत्तरात आयर्लंडची सुरुवात खराब झाली. प्रसिद्ध कृष्णाने तिसऱ्या षटकात आयर्लंडच्या दोन फलंदाजांना माघारी पाठवले. पॉल स्टर्लिंग ( ०) व लॉर्कन टकर ( ०) हे माघारी परतल्याने आयर्लंडची अवस्था २ बाद १९ अशी झाली.