ऑकलंड - तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडसमोर ३०७ धावांचे आव्हान ठेवले आहे. प्रथम फलंदाजी करताना कर्णधार शिखर धवन आणि शुभमन गिल यांनी दिलेल्या शतकी सलामीनंतर भारताची फलंदाजी कोलमडली. मात्र श्रेयस अय्यरने शानदार ८० धावांची खेळी करत संघाला ७ बाद ३०६ धावांपर्यंत मजल मारून दिली.
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केल्यावर कर्णधार शिखर धवन आणि शुभमन गिल यांनी गोलंदाजीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर सावध सुरुवात केली. मात्र खेळपट्टीवर जम बसल्यावर दोघांनीही आक्रमक पवित्रा घेतला. दोघांनीही अर्धशतके फटकावत भारताला २३ षटकांमध्ये १२४ धावांची सलामी दिली. दरम्यान शुभमन गिल २४ व्य़ा षटकात ५० धावा काढून फर्ग्युसनची शिकार झाला. त्याच्यापाठोपाठ शिखर धवनलाही टीम साऊथीने ७२ धावांवर बाद केले. दोन्ही सलामीवीर पाठोपाठ बाद झाल्यानंतर भारताची फलंदाजी कोलमडली. रिषभ पंत १५ आणि सूर्यकुमार यादव ४ धावा काढून बाद झाल्याने भारताची अवस्था ४ बाद १६० अशी झाली.
त्यानंतर श्रेयस अय्यरने संजून सॅमसनसह मोर्चा सांभाळला. त्यांनी पाचव्या विकेटसाठी ९४ धावा जोडत भारताला अडीचशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. मात्र सॅमनसन मोठी खेळी करू शकला नाही. तो ३६ धावांवर मिलनेची शिकार झाला. दुसऱ्या बाजूला श्रेयस अय्यरने मात्र आपलं अर्धशतक पूर्ण केलं. तसेच अखेरच्या षटकांमध्ये श्रेयसला वॉशिंग्टन सुंदरने सुरेख साथ दिली. श्रेयस अय्यर डावातील शेवटच्या षटकात ८० धावा काढून बाद झाला. त्याला साऊथीने माघारी धाडले. मात्र तोपर्यंत त्यांने भारताला तीनशेपार मजल मारून दिली होती. वॉशिंग्टन सुंदरनेही शेवटच्या षटकांमध्ये सुरेख फटकेबाजी करत १६ चेंडूत ३७ धावा चोपल्या. त्या जोरावर भारताने ५० षटकांत ७ बाद ३०६ धावांपर्यंत मजल मारली. न्यूझीलंडकडून फर्ग्युसन आणि साऊथीने प्रत्येकी ३, तर मिलने याने १ बळी टिपला.